Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रविश्वहिंदू परिषदेच्या वतीने मंदिरे खुली करण्यासाठी शनिवारी शंख-ढोल नाद आंदोलन

विश्वहिंदू परिषदेच्या वतीने मंदिरे खुली करण्यासाठी शनिवारी शंख-ढोल नाद आंदोलन

पुणे(प्रतिनिधी)

महाराष्ट्रातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची व्यवस्था होत असते, हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाने ठप्प झाले आहे. कोणत्याही निवडणुकीत सगळे छोटे-मोठे पुढारी देवळात दर्शन घेऊनच प्रचार करतात. त्यामुळे किमान आता तरी सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा. हिंदुत्वनिष्ठ असलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा विचार करावा व या दस-याला देवालये भक्तांसाठी खुली करावीत अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. दरम्यान,सरकारला जाग यावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात शनिवार, दिनांक २४ आॅक्टोबर रोजी प्रत्येक मंदिरासमोर शंख ढोल यांचा नाद करून आरतीचे आयोजन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. येत्या दस-याला सरकारने जर मंदिरे उघडली नाहीत तर भविष्यात परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेला प्रांत सहमंत्री संजय मुद्राळे, विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, मंदिर संपर्क प्रमुख मनोहर ओक, तुषार कुलकर्णी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

शंकर गायकर म्हणाले, दसरा दिवाळीचे महत्व हिंदू समाजासाठी मोठे आहे. दसरा-दिवाळी मध्ये देवाला साक्षी ठेवून नवीन वस्तूंची खरेदी हिंदू समाज करत असतो, अशा प्रसंगी देवालये उघडी नसतील, तर श्रद्धावान हिंदूंचे आर्थिक व्यवहारही कमी होतील. त्यामुळे भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर उघडावी यासाठी आता विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे. गेली चार महिने टप्प्याटप्प्याने का होईना सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. सर्व बाजारपेठा, भाजीबाजार, मॉल, सर्व दुकाने, बँका, सर्व खाजगी सरकारी कार्यालय, कंपन्या, कारखाने सगळेच व्यवस्थित सुरू आहे. सर्व ठिकाणी प्रचंड गर्दीही ओसंडून वाहत आहे. दस-याला तर व्यायाम शाळा सुरू होत आहेत. परीक्षा देखील घेतल्या जात आहेत. हे सगळे सुरू आहे तर मंदिरांवर सरकार रोष का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सध्याच्या काळात मंदिर ही तर समाजाच्या अधिक गरजेची झाली आहेत. आर्थिक, मानसिक व भावनिकदृश्ष्टया अस्थिर झालेल्या माणसाला देवाच्या दर्शनाने अधिक उमेदीने जगण्याचे बळ मिळते. मानसिक व भावनिक आधार मिळतो. हिंदू समाजाच्या स्थैर्याची मंदिरे मुख्य केंद्र आहेत. मंदिरातील देवते वरील श्रद्धेने सदाचार, संयम व नीतिमत्तेचे आचरण हिंदू समाजाचे होत असते. मंदिरांवर अनेक गावांची, धर्मस्थानांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. महाराष्ट्र ही जागृत धर्मस्थानांची भूमी आहे. देवींची साडेतीन शक्तीपीठ, बारा जोर्तिलिंगांपैकी पाच जोर्तिलिंग, अष्टविनायक मंदिरे , जेजुरी-ज्योतिबा सारखी कुलदैवते, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा अनेक संतांच्या कर्मभूमी, पंढरपूरसारखे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, शिर्डीसारखे श्रध्दास्थान अशा अनेक तीर्थक्षेत्रांचे अर्थव्यवहार सद्य कालात ठप्प झाले आहेत. मंदिरांच्या आश्रयाने असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. गुरव-पुजारी-पुरोहित या वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. अनेक देवालयांवर सरकारचे ट्रस्टी आहेत, तेथील दानपेटीतील धन सरकारी योजनांसाठी वापरले जाते. आषाढी वारीत मंत्र्यांनी विठ्ठलाची पूजा केली. सर्वसामान्य वारकरी मात्र विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकुळ आहे. लवकरच कार्तिक वारी येत आहे. त्यामुळे मंदिरे उघडणे गरजेचे आहे.

सर्व साधु-संत, कीर्तनकार, मंदिरांचे विश्वस्त यांच्या आग्रहामुळे परिषदेने महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, सर्व जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदने दिली आहेत. हिंदू समाज खूप संयमी आहे. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले त्याप्रमाणे दहीहंडी, गणपती असे सगळेच महत्त्वाचे सण साधेपणाने घरातच साजरे केले. आता हिंदू समाजाचा संयम संपत चालला आहे. आपल्या श्रद्धेय देवतेचे दर्शन घेता येऊ नये याची वेदना आता वाढत चालली आहे. त्यामुळे दस-याला मंदिरे न उघडल्यास आंदोलन मोठया स्वरुपात केले जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या