सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास नुकताच वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट पुणे यांनी गळीत हंगाम 2020 – 21 करिता उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे, अशी माहिती कारखान्याचे तज्ज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आजपर्यंत कारखान्याने अनेक नवीन उपक्रम राबविलेले असून देशात सर्व प्रथम केमिकल व औषधी प्रकल्प उभारणी केली आहे. तसेच ऊस गाळपासह विविध रासायनिक उपपदार्थ, सहवीज निर्मीती आदींबाबत नावलौकीक कामगिरी केलेली आहे. कारखान्याने सन 2020 – 21 मध्ये उस गाळप क्षमता वापर 101.42 टक्के असून साखर उतारा 10.90 टक्के इतका होता. मागील दोन वर्षांच्या तुलनेत साखर उतार्‍यात 0.57 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्याचाच भाग म्हणून सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली संस्था वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट पुणे यांनी कोल्हे कारखान्याची उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी निवड केली.

यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे कुशल नेतृत्व सर्व संचालक व सभासद बंधू यांची मोलाची साथ तसेच कार्यकारी संचालक बी.जी.सुतार व त्यांचे सर्व व्यवस्थापन समिती,कर्मचारी व कारखान्याशी संबंधित असलेले घटक यांनी दाखविलेल्या कार्यक्षमतेमुळेच कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर झाला आहे.