Friday, April 26, 2024
Homeनगर‘शहापूर-घोटी-विशाखापट्टणम’ राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करा

‘शहापूर-घोटी-विशाखापट्टणम’ राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

शहापूर-घोटी-विशाखापट्टणम हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करून या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे, असा प्रस्ताव राज्य शासनाच्यावतीने केंद्राकडे सादर करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की शहापूर-घोट- विशाखापट्टणम् (अकोले-संगमनेर-श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव-गेवराई मार्गे) या राज्य मार्गाला केंद्र सरकारकडून 2017 मध्ये नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वतः मान्यता मिळाली होती. या महामार्गासाठी पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने यावर योग्य ती कार्यवाही करून 20 सप्टेंबर 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावर राज्य शासनाच्यावतीने कार्यवाही पूर्ण होऊन 9 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून जाणारे कल्याण-विशाखापट्टणम तसेच शहापूर-घोटी-विशाखापट्टणम हे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. पैकी कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम बीड जिल्ह्यातील गेवराई पर्यंत पूर्ण झालेले आहे. त्यामुळे घोटी विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाला गेवराई येथे जोडावयाचे आहे. शहापूर-घोटी-विशाखापट्टणम या मार्गावर औद्योगिक कृषी तसेच साखर कारखाने जास्त प्रमाणात असल्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रक-ट्रॅक्टर व हा मार्ग पठारी भागातून जात असल्याने अवजड मालाची वाहतूक करणारे ट्रक कंटेनर याच रस्त्याचा वापर करतात. तसेच या मार्गावर शिर्डी, शनिशिंगणापूर, देवगड, नेवासा, औंढा नागनाथ, माहूर, तिरुपतीबालाजी इत्यादी देवस्थाने असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाहतुकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने हा राज्यमार्ग अपुरा पडत आहे.

राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे रियल इस्टेट, प्लॉटिंग, हॉटेलिंग व अन्य व्यावसायिकांना सुगीचे दिवस येणार आहेत. शेतजमीन व अन्य जागांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. शेतकर्‍यांना आपला शेतीमाल मुंबईला नेण्यासाठी सुलभता येणार आहे.

शहापूर-घोटी-विशाखापट्टणम या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा यासाठी मी व स्व. खासदार दिलीप गांधी आम्ही दोघांनी वेळोवेळी केंद्राकडे पाठपुरावा केला. या मार्गाचा प्रस्ताव केंद्राकडे गेल्याने रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या मार्गास भारतमाता योजना दोन मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

– भाऊसाहेब वाकचौरे माजी खासदार, शिर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या