Tuesday, April 23, 2024
Homeनगरशहापूर-घोटी-श्रीरामपूर मार्गे नेवासा राज्य मार्गाचे काम लवकरच सुरू होणार

शहापूर-घोटी-श्रीरामपूर मार्गे नेवासा राज्य मार्गाचे काम लवकरच सुरू होणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहापूर-घोटी, राजूर, अकोले, संगमनेर, लोणी-श्रीरामपूर नेवासा या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता.

- Advertisement -

आता या राज्य मार्गाचे कामाची ई निविदा निघाली असून या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे श्रीरामपुरातील अनेक दुकानांवर हातोडा पडणार असल्यामुळे अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. याबरोबरच शहरातील अन्य रस्त्यांचेही काम लवकरच सुरु होणार आहे. या रस्त्यामुळे दोन महामार्गांना श्रीरामपूर जोडले जाणार आहे. यामुळे श्रीरामपूरचे भविष्य उज्वल होणार आहे.

राज्य शासनाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहर व तालुक्यातील रस्त्यांच्या कामांच्या ई निविदा प्रसिध्द झाल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यांचे काम सुरू होणार आहे. यात राहाता-चितळी-निमगाव खैरी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होणार आहे. शहापूर-घोटी, राजूर, अकोले, संगमनेर, लोणी-श्रीरामपूर-नेवासा या 117 कि. मी. रस्त्याचे तसेच या रस्त्यामधील पुलाचे काम करणे, कोल्हार- बेलापूर, बेलपिंपळगाव या 81 कि. मी. रस्त्याचे काम तसेच कोपरगाव-पुणतांबा- बेलापूर- राहुरी फॅक्टरी याही रस्त्याच्या कामाचा या निविदेत समावेश असून पुणतांबा- नाऊर- माळेवाडी- घुमनदेव- घोगरगाव या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.

तसेच श्रीरामपूर शहरातील नगरपरिषद अंतर्गत श्रीरामपूर येथील मौलाना आझाद चौक ते नेहरुनगरपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, झिरंगे वस्ती ते साई भुयारी मार्ग ते गोपीनाथनगरपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, बोंबले वस्ती अंतर्गत, चौधरी मळ्याअंतर्गत रस्ते डांबरीकरण, काँग्रेस भवनपासून ते साईमंदिरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, कौशल्यानगरमधील गजानन अपार्टमेंट ते गंगवाल यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, कुंकूलोळ कॉम्प्लेक्स वेशीपासून मयुर सोनार यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण, मिल्लतनगर, फातेमा हाउसिंग सोसायटी, रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, निरंकारी भवन ते कॅनाल पूल ते कॅनाललगतचा एल टाईप रस्ता डांबरीकरण करणे, श्रीरामपूर येथील वायमरन काळे यांच्या घरापासून ते पठाण वस्ती साईविश्व कॉप्म्लेक्स ते बोरावके यांच्या घरासमोरील रस्ता डांबरीकरण करणे या रस्त्यांच्या कामाची ई-निविदा काढण्यात आली असून सदर रस्त्यांचे काम मार्चनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

या महामार्गामुळे श्रीरामपूरच्या विकासाला चालना मिळणार- आ.लहु कानडे

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले घोटी-संगमनेर, बाभळेश्वर-श्रीरामपूर नेवासा राज्य महामार्गाचे काम पहिल्याच अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून या रस्त्याचा अहवाल मंजूर करून घेतला. आता या रस्त्याच्या कामासाठी ई-निविदा काढण्यात आली असून लवकरच या महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या महामार्गामुळे श्रीरामपूर हे दोन महामार्गाला जोडले जाणार असून यामुळे श्रीरामपूरच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच श्रीरामपूर एमआयडीसीत नवीन उद्योग येण्यास सुरुवात होणार आहे. या महामार्गामुळे श्रीरामपूरचे भविष्यच बदलले जाणार असल्याची माहिती आ. लहू कानडे यांनी दिली. श्रीरामपूरच्यादृष्टीने बाभळेश्वर ते नेवासा हा रस्ता खूपच महत्त्वपूर्ण असल्याने सर्वांनी यासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही आ. कानडे यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर श्रीरामपूर नगरपरिषदअंतर्गत अनेक रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील रस्ते चकाचक होणार असल्यामुळे श्रीरामपूरचा चेहरा मोहराच बदलला जाणार असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या