Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबार‘त्या’ पोलीस कर्मचार्‍यांकडून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न

‘त्या’ पोलीस कर्मचार्‍यांकडून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न

नरेंद्र बागले,शहादा – Shahada :

जिल्हा पोलिस दलातील 231 पोलीस कर्मचार्‍यांच्या आठवडाभरापूर्वीच बदल्या करण्यात आल्या. त्यात शहाद्यातील 28 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

- Advertisement -

बदली झालेले कर्मचारी तात्काळ कार्यमुक्त होवून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले आहेत. मात्र बदली होऊनदेखील काही कर्मचारी बदली रद्द करून शहाद्यातच राहण्यासाठी जिल्हयातील मातब्बर राजकीय नेत्यांकडून पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते.

त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अश्या दबावाला कितपत महत्व देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दि.29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील 231 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या.

त्यात शहाद्यातील 28 कर्मचार्‍यांचा समावेश असून पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीला अडचणीत आणणार्‍या डीबी पथकातील चार कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्याचे आदेशात म्हटले असले तरी दैनिक देशदूतमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेचा प्रभाव आहे.

पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे शहाद्यातील घडलेली दंगल आणि एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीमुळे शहादा पोलिसांच्या कार्यप्रणालीकडे बोट दाखविले गेले.

पोलिसांच्या प्रतिमेला त्यामुळे धक्का बसला. अर्थात स्थानिक पोलीस अधिकार्‍यांना अडचणीत आणणार्‍या या घटनांमागे डीबी पथकातील कर्मचार्‍यांची अकार्यक्षमता प्रामुख्याने दिसून आली.

पोलिसांचे कर्तव्य विसरून वेगळ्याच कार्यात गुंतलेल्या या पथकातील कर्मचार्‍यांचे अवैध धंदेवाल्यांशी असलेले साटेलोटे आणि शहरातील आतापर्यंत झालेल्या शेकडो मोटरसायकलीच्या चोर्‍या व घरफोड्यांच्या घटना उघडकीस आणण्यात आलेले अपयश आणि नागरिकांमध्ये पोलिसांविषयी असलेली नाराजी, शिवाय वर्षानुवर्ष शहाद्यात बस्तान मांडून बसलेले काही पोलिस कर्मचार्‍यांच्या बदलीचा कार्यकाळ अशा संपूर्ण घटनाक्रमावर दैनिक देशदूत प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती.

या सर्व घडामोडींची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गंभीर दखल घेत जिल्हाभरातील पोलिसांच्या तात्काळ बदल्या केल्या. या बदल्या करताना प्रशासकीय कारण असल्याचे आदेशात नमूद केले असले तरी त्यावर देशदूत वृत्त मालिकेचा प्रभाव दिसून आला.

कारण शहरातील डीबी पथकातील पोलिस कर्मचार्‍यांसह 28 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्या झालेल्या कर्मचार्‍यांना तात्काळ कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले.

कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करताना टाळाटाळ करणार्‍या प्रभारी अधिकार्‍यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेशात म्हटले आहे.

तसेच जे कर्मचारी बदली रद्द करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतील अशांवरदेखील कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे.

कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची कर्तव्यकठोर शिस्तप्रणाली पाहून बदलीपात्र कर्मचारी तात्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. शहाद्यात देखील 23 नवीन कर्मचारी तात्काळ सुरू झाले आहेत.

तर बदलीपात्र सर्व कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. असे असतानाही डीबी पथकातील बदली झालेल्या कर्मचार्‍यांकडून बदली रद्द करण्यासाठी राज्यात सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील मातब्बर राजकीय नेत्यांकडून पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समजते.

काहीही करून शहाद्यात राहण्यासाठी त्या कर्मचार्‍यांकडून आटापिटा सुरू असल्याचे समजते. अत्यंत शिस्तप्रिय असलेले कुठल्याही दबावाला न जुमानणारे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची कार्यप्रणाली संपूर्ण पोलिस दलाला परिचित असतानाही बदलीसाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करू पाहणारे असे पोलीस कर्मचारी किती निर्ढावलेले आहेत हे सिद्ध होते.

त्यामुळे अशा प्रकारांना पोलीस अधीक्षक कितपत थारा देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या