Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरी शहर व परिसरात सात दिवसांचा लॉकडाऊन

राहुरी शहर व परिसरात सात दिवसांचा लॉकडाऊन

राहुरी (तालुका प्रतिनिधी) –

करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने करोना साखळी तोडण्यासाठी राहुरी शहर व परिसरात येणार्‍या गुरुवारपासून

- Advertisement -

सात दिवसांचा लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

शहरातील व्यापारी संघटना, विविध सामाजिक संघटना व शहरवासियांच्या उपस्थितीत करोना महामारी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. शहरात दररोज रुग्णसंख्या वाढत असून यासाठी आवश्यक सूचना देऊनही गर्दी दररोज वाढत आहे. यातून रुग्णसंख्या वाढत असून ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले. तहसीलदार फसियोउद्दीन शेख, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, नीरज बोकील, व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख, डॉक्टर संघटनेचे डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. प्रवीण कोरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड,

डॉ. जासूद, आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे, राजेंद्र सिन्नरकर, राजेंद्र सुराणा, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, दिलीप चौधरी, अशोक आहेर आदींसह ग्रामस्थांनी लॉकडाऊनची गरज व्यक्त केली. लॉकडाऊन काळात शहरातील दवाखाने 24 तास वैद्यकीय सेवेसाठी उघडे राहतील. मेडिकल स्टोअर्स उघडे राहतील, याव्यतिरीक्त किराणा, भाजीपाला, फळ विक्रेते, कापड व्यापारी व इतर दुकाने या आठ दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहतील. दूधवाल्यांसाठी सकाळी सात ते आठ व संध्याकाळी सहा ते सात याप्रमाणे सवलत देण्यात आली आहे.

तालुक्यातील डॉक्टर्स या काळात रुग्णसेवेसाठी तत्पर राहतील, असे आश्वासन डॉक्टर संघटनेतर्फे डॉ. जयंत कुलकर्णी व प्रवीण कोरडे यांनी दिले. शहरातील बालाजी मंदिरातील कोव्हीड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येईल. याठिकाणी योग्य सुविधा देऊन रुग्णांना सोय करून दिली जाईल, असे आश्वासन ना. तनपुरे यांनी दिले. शहरातील नगरपालिकेची शाळा लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने सहकार्य करावे व लसीकरणाचा वेग वाढवावा, त्याचबरोबर लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंगसाठी नगरपरिषदेने संगणक हाताळणारे दोन कर्मचारी त्वरित उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.

शहरातील स्वयंसेवी संघटना, सर्व नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डात लसीकरण न झालेल्या नागरिकांना त्वरित लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त करणे व सहकार्य करावे असे आवाहन नामदार तनपुरे यांनी यावेळी केले. ज्या गरजुंना रेशन व इतर सुविधा नाहीत, त्यांच्यासाठी प्राजक्त दादा तनपुरे मित्रमंडळ, रोटरी क्लब, राहुरी, गणेश मंडळाचे पदाधिकारी व स्वयंसेवी संघटना मिळून सहकार्य करावे, असे आवाहनही नामदार तनपुरे यांनी केले. शहर आपले आहे, येथील नागरिकांचे आरोग्य जपणे आपलेच काम, आपली जबाबदारी आहे. यासाठी सर्वांनीच हा लॉकडाऊन यशस्वी करून करोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच यापुढील काळात मास्क वापरणे, सॅनिटायझर, अनावश्यक गर्दी यासह शासकीय नियमांचे पालन करून या महामारीवर सांघिकरित्या मात करावी, असे आवाहन नामदार तनपुरे यांनी केले. राहुरी शहरात एकाच दिवसांत 124 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून काळजी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले. वांबोरी, राहुरी विद्यापीठ येथे सुमारे 40 ते 50 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या