Thursday, April 25, 2024
Homeनगरसर्व्हरच्या अडचणीमुळे तलाठ्यांची वाढली डोकेदुखी

सर्व्हरच्या अडचणीमुळे तलाठ्यांची वाढली डोकेदुखी

नेवासा |शहर, तालुका प्रतिनिधी| Newasa

प्रशासकीय कामकाज करताना डीआयएलआरएमपी सर्व्हर मधील येत असलेल्या अडचणीमुळे तलाठ्यांची डोकेदुखी वाढली असून मोठा त्रासही सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

कामकाजातही अडथळे निर्माण होत असल्याने डिजिटल सिग्निचर तहसीलला जमा करणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य तलाठी संघ नेवासा यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात तलाठी संघाने म्हटले आहे की डीआयएलआरएमपी सर्व्हर मशीन हे मागील एक महिन्यापासून स्पीड नसल्याने तसेच बहुतांश बंदच असल्याने तलाठी यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे.

सर्व्हर रोज कार्यालयीन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत स्पीड हा कमीच असतो. कधी कधी तर तो बंदच असतो. त्यामुळे शेतकर्‍यांना सात-बारा उतारे देणे शक्य होत नाही. ई फेरफारची कामेही प्रलंबित आहे. दररोज तेच तेच उत्तर ऐकून खातेदारही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तलाठी व शेतकरी यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण होत असल्याने मंडलाधिकारी व तलाठी हे तणावाच्या स्थितीत आहेत.

सर्व्हर स्पीड बाबत वरिष्ठांना कळविण्यात येऊनही समस्या दूर होण्यासाठी कायमची उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अहमदनगर उपविभागीय उपाध्यक्ष सोपानराव गायकवाड, तालुकाध्यक्ष अनिल गव्हाणे, सरचिटणीस बद्रीनाथ कमानदार उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या