Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरज्येष्ठ तमाशा कलावती कांताबाई सातारकर यांचे निधन

ज्येष्ठ तमाशा कलावती कांताबाई सातारकर यांचे निधन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका साकारलेल्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर (वय 82) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

- Advertisement -

राज्यातील सर्वात मोठ्या तमाशा मंडळाच्या मालकीन असलेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत, राज्याचा पहिलाच विठाबाई नारायणगावकर पुरस्कार प्राप्त, तमाशा सम्राज्ञी श्रीमती कांताबाई सातारकर या कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत्या.

सन 1939 साली जन्मलेल्या श्रीमती सातारकर यांनी वयाच्या अवध्या नवव्या वर्षी नवझंकार मेळ्यातून रंगमंचावर पाय ठेवला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी आसपासच्या काही तमाशा मंडळांमध्ये कामही केले. 1953 साली त्यांनी तुकाराम खेडकर यांच्या तमाशा मंडळात काम सुरु केले आणि शेवटपर्यंत त्या या तमाशा मंडळाच्याच पाईक बनून राहील्या. 1954 साली त्यांनी तुकाराम खेडकर यांच्यासोबतच लग्नगाठ बांधली व त्या तुकाराम खेडकरसह कांताबाई साताकर या तमाशा फडाच्या मालकीन बनल्या. त्यांना अलका, अनिता, रघुवीर व मंदा अशी चार अपत्ये आहेत.

श्रीमती सातारकर यांनी तुकाराम खेडकर यांच्यासोबत पन्नासाहून अधिक सामाजिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक व प्रासंगिक वगातून मुख्य भूमिका बजावल्या आहेत. सन 1958 साली भालजी पेंढारकर यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याविषयी विचारणाही केली होती. श्रीमती सातारकर आपल्या पहाडी आवाजातून पोवाडाही सादर करायच्या. त्यांच्या मुखातून सह्याद्रीच्या पराक्रमाचे गुणगान श्रवतांना श्रोते अक्षरशः भारावून जात असतं.

एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित,अभिजित,नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. त्यांच्या जीवनावर डॉ संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आजवर चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला आहे. असंख्य पुरस्कार, असंख्य मानसन्मान मिळवलेल्या या महान कलावतीला मात्र रसिकांचे प्रेम हाच आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान वाटायचा.

- Advertisment -

ताज्या बातम्या