Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबळीराजासाठी सुरक्षा ॲप; नाकृउबा समीतीचा पुढाकार

बळीराजासाठी सुरक्षा ॲप; नाकृउबा समीतीचा पुढाकार

पंचवटी l Panchvati (वार्ताहर) :

बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून बळीराजाची होणारी फसवणूक किंवा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असो, आता या सर्वच समस्यांवर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने उपाय शोधला आहे. एका ॲपच्या माध्यमातून बळीराजाची सुरक्षा करण्याचा प्रयत्न समितीने केला आहे.

- Advertisement -

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक ॲप तयार केले आहे. विशेष म्हणजे या ॲपच्या माध्यमातून दररोजचे शेतमालाचे बाजार भावदेखील क्षणार्धात समजणार आहेत. शनिवारी (ता.०६) संचालक मंडळाच्या उपस्थितीत सभापती देविदास पिंगळे यांच्या हस्ते या ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपसभापती रवींद्र भोये, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, संपत सकाळे, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, संजय तुंगार, भाऊसाहेब खांडबहाले, श्याम गावित, संदीप पाटील, चंद्रकांत निकम ,प्रवीण नागरे, विनायक माळेकर आदी उपस्थित होते.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याची आहे. या ठिकाणी नाशिक जिल्हासह परजिल्ह्यातून पालेभाज्या, फळभाज्या घेऊन शेतकरी येत असतात. त्याचप्रमाणे कांदा, बटाटा, लसूण व फळेदेखील येत असतात. शेतकऱ्याची सुरक्षितता वाढावी व त्यांची बाजार समिती आवाराबाहेर होणारी फसवणूक होऊ नये यासाठी सभापती देविदास पिंगळे यांच्या संकल्पनेतून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.

यात शेतकऱ्यास बाजार समिती आवारात फळभाज्या, पालेभाज्या, कांदा लसूण, बटाटा यास मिळालेला बाजार भाव दोन सत्रात प्रसिद्ध केला जाईल. जेणेकरून शेतकऱ्यांस मिळालेला बाजारभाव माहिती होइल. सद्यस्थितीत नियमनमुक्तीमुळे व्यापारी शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करू लागला आहे. यात बाजारात शेतमालास काय बाजार भाव मिळाला, हे शेतकऱ्यास माहिती नसते. त्यामुळे आलेला व्यापारी कवडीमोल भावात खरेदी करतो. परिणामी, शेतकऱ्याचे नुकसान होते. शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीने या ॲपची निर्मिती केली आहे.

शेतकऱ्याला करता येणार तक्रार

नाशिक बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यास कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागू नये. तसेच आवारात लिलाव प्रक्रियेदरम्यान, व्यापारी, आडते, हमाल किंवा अन्य कुणाकडून काही अडचण भासल्यास संबधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी या अँपच्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे.

शेतकरी डायरेक्ट कनेक्ट टू संचालक मंडळ

बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यास अडचण आल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधला आणि त्यास काही प्रतिसाद किंवा वेळीच मदत मिळत नसेल, तर शेतकरी या अँपच्या माध्यमातून ‘डायरेक्ट कनेक्ट टू सभापती, संचालक मंडळ’ असे नियोजन केले आहे. जेणे करून समस्या किंवा अडचणी तात्काळ दूर करत शेतकऱ्यास प्रतिसाद न देणाऱ्या कर्मचाऱ्याची तक्रारदेखील करता येणार आहे.

अँप विनामूल्य

शेतकऱ्यांसाठी ॲप विनामूल्य देण्यात येणार आहे. सदर ॲप सदस्य नोंदणी प्रक्रिया अगदी सोपी आणि सुलभ करण्यात आली आहे. अँड्रॉइड मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये प्रवेश करत ‘नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती’ असे नाव टाकल्यास ॲप ओपन होईल. त्यानंतर ते डाउनलोड करून मोबाईलमध्ये इंस्टॉल करता येईल. या http://bit.ly/apmcnsk लिंकवर क्लीक करून अप इन्स्टॉल करता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या