‘माध्यमिक’च्या निवडणुकीसाठी 340 अर्ज दाखल

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर (वार्ताहर) – जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यामुळे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या वर्तुळातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी (दि.10) शेवटच्या दिवशी 21 संचालकांच्या जागांसाठी 340 अर्ज दाखल झाले आहेत.

10 हजार 203 मतदार असलेल्या जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक 9 फेब्रुवारी रोजी होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस होता. संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 340 उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाभरातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राध्यापकांनी नगर तालुका उपनिबंधकांच्या कार्यालयात गर्दी केली होती. मोठ्या संख्येने अर्ज आल्याने दुपारी तिननंतर आलेल्या अर्जाची जुळवाजुळव करण्यात निवडणूक यंत्रणा व्यस्त होती.

दाखल झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची 13 जानेवारी रोजी छाननी होणार असुन त्यानंतर 14 ते 28 जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 29 जानेवारीला उमेदवारांची अंतिम मतदार यादी तयार होऊन त्यांनतर चिन्हाचे वाटप होईल. त्यानंतर मतदान 9 फेब्रुवारी रोजी तालुकानिहाय घेण्यात येणार असून मतमोजणी 10 तारखेला एकत्रीत करण्यात येणार आहे.
दरम्यान, निवडणुकीसाठी उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली असून माध्यमिक शिक्षकांमधील गटा-तटाचे राजकारण आता चांगलेच तापायला सुरूवात झाली आहे. विद्यमान सत्ताधारी पुरोगामी सहकार मंडळ व परिवर्तन सेवा मंडळ यांनी एकमेकांच्या विरोधात मैदानात उडी घेतली आहे. सत्ताधारी गटाचे भाऊसाहेब कचरे यांच्या पॅनलाला धूळ चारण्यासाठी विरोधी गटाने कंबर कसली आहे. यासाठी आतापासून डावपेच आखण्यात येत आहेत. उमेदवार फायनल झाल्यावर खर्‍या आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वातावरण ढवळून निघणार आहे.

तिसर्‍या आघाडीचीही चर्चा
माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन होण्याच्या चर्चेने जोर धरला असून दोन किंवा तीन आघाड्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मागील वेळी उमेदवारी न मिळालेल्या काही उमेदवारांनी एकत्र येत तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयोग यंदा यशस्वी होतो की नाही, हे पाहणे गरजेचे राहणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *