Saturday, April 27, 2024
Homeनगरसभा अनधिकृतपणे, सर्व खर्च सभासदांच्या माथी

सभा अनधिकृतपणे, सर्व खर्च सभासदांच्या माथी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात अनधिकृतपणे घेण्यात आली असून, याचा सर्व खर्च सभासदांच्या माथी मारण्यात आल्याचा आरोप करत परिवर्तन मंडळाचे विरोधी संचालक व सभासदांनी सभेच्या ठिकाणी आंदोलन केले. टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे झालेल्या सभेच्या प्रवेशद्वारावर ‘मी निवृत्त होतोय खर्च मात्र सभासदांचाच…’ असा मजकूर लिहिलेले गुरूजींचा प्रतिकात्मक पुतळ्यास हार घालून निषेध नोंदवून सभासदांना 15 टक्के लाभांश मिळावा व इतर मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisement -

या आंदोलनात सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे यांच्यासह राजेंद्र कोतकर, बाळासाहेब राजळे, सुनील दानवे, नंदू शितोळे, भाऊसाहेब जिवडे, अर्जुन भुजबळ, मंगेश काळे, प्रसाद साठे, बाळासाहेब जाधव, जनार्धन सुपेकर, राहुल आवारे, दिलीप बोठे आदींसह सभासद सहभागी झाले होते.

सभासदांना 15 टक्के लाभांश मिळावा, जामीन कर्ज मर्यादा 25 लाख करावी, सभासदांचे कायम ठेवीवरील व्याजदर वाढवण्याची मागणी विरोधी संचालक व सभासदांनी लावून धरली होती. दरवर्षी मे महिन्यात सभा होईल काय?, कायम ठेवीवरील व्याज मागील वर्षाप्रमाणे एप्रिल महिन्यात का दिले नाही?, सुट्टी असल्यामुळे वार्षिक अहवाल अद्यापही सभासदांना पोहोचला नाही याला जबाबदार कोण?, नोकरभरती करताना मयत झालेल्या सभासदांच्या पाल्यांना प्राधान्य का दिले नाही?, डाटा सेंटर सोसायटीच्या बाहेर त्रयस्थ यंत्रणेला देण्याचे गोड बंगाल काय? आदी प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले.

तर संस्थेच्या शाखांची जागा खरेदी, डाटा सेंटर भाडे तत्वावर देणे, नवीन लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे, अशा आर्थिक लाभांसाठी भर उन्हाळ्यात यावर्षी संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच वार्षिक सभा ठेवण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मयत सभासदांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद सत्ताधारी संचालक मंडळाने केली नसल्याचा व मयत सभासदांच्या पाल्यांना नोकर भरतीत डावलल्याचा निषेधही यावेळी नोंदविण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या