Thursday, April 25, 2024
Homeजळगावमुक्ताईनगर शहरात महिन्याभरात डेंग्यूचा दुसरा बळी..!

मुक्ताईनगर शहरात महिन्याभरात डेंग्यूचा दुसरा बळी..!

मुक्ताईनगर – Muktainagar – वार्ताहर :

मुक्ताईनगर शहरात गेल्या एका महिन्यात डेंगू आजाराचा मुक्ताईनगर पंचायतीच्या नगरसेवकाच्या नातवाच्या रूपाने दुसरा बळी गेल्याची घटना घडल्याने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.सोबतच मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

- Advertisement -

याबाबत मिळालेली माहिती अशी की , मुक्ताईनगर शहरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून डेंगू सदृश्य आजाराची लागण सुरू आहे.

त्यासंदर्भात मुक्ताईनगर शहरातील 17 पैकी काही प्रभागांमध्ये एक वेळेस तर काही ठिकाणी दोन वेळेस धुरळणी करण्यात आली आहे.

परंतु ठिकाणी पाण्याचे डबके साचून त्याठिकाणी डासांची निर्मिती झालेली असून त्यामुळे दुर्गंधी पसरली असून मलेरिया ची साथही सुरू आहे.

यासंदर्भात बर्‍याच वेळेस वर्तमानपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. काही दिवसांपूर्वीच डेंग्यूमुळे 36 वर्षीय महिलेलाही आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळेस जिल्हा आरोग्य अधिकारी जमदार यांनी पदभार स्वीकारला होता आणि त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर शहर गाठले होते.

त्यावेळेस आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी श्री जमदार यांनी तहसीलदार शेता संचेती, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.योगेश राणे,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गाडेकर तसेच नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड तसेच इतर वैद्यकीय अधिकार्‍यांना बोलावून तातडीची बैठक घेऊन डेंग्यू आजारास आळा बसवण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती.

त्याप्रसंगी आरोग्य विभागातर्फे सुद्धा पाच पथके नेमण्यात येऊन त्याद्वारा सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये बड्या नेत्याच्या कुटुंबातील व्यक्तींनाही डेंगू ची लागण झाली होती परंतु सुदैवाने त्यांनी लवकर उपचार घेतल्याने अनर्थ टळला. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकाच्या दोन मुलांनाही डेंग्यूची लागण झाली होती.

त्यामुळे खुद्द नगरसेवकांनीच मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार करून डेंगू संदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. त्यावर वेळीच उपाययोजना न झाल्यामुळे काल 17 रोजी मुक्ताईनगर येथील नगरसेवक मस्तान कुरेशी यांचा बारा वर्षीय नातू शेख अबुजर शेख नजीर कुरेशी याचा डेंग्यूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला मुक्ताईनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप नगरसेवकातर्फे करण्यात येत आहे.

त्यानंतर नगरसेवकांनी स्वतः मुख्याधिकारी श्रीमती गायकवाड यांना भ्रमणध्वनी वरून कळवून सुद्धा यासंदर्भात दुसर्‍या दिवशीसुद्धा नगरपंचायत प्रशासनातर्फे काहीच उपाय योजना कानात आल्या नसल्याचे नगरसेविकेचे पती अरिफ आझाद यांनी आरोप केला आहे.

इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधींसह नगरसेवकांनी राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या आरोग्य संदर्भात प्रशासनाविरोधात एकत्रित येण्याची गरज असल्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.

मुक्ताईनगर शहरात डेंगूचा दुसरा बळी गेल्याने मुक्ताईनगर नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्यात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या