Saturday, April 27, 2024
Homeनगरदुसर्‍या डोससाठी ज्येष्ठ नागरिकांची परवड

दुसर्‍या डोससाठी ज्येष्ठ नागरिकांची परवड

राहाता |प्रतिनिधी| Rahata

करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 45 वर्ष व त्यापेक्षा जास्त वर्षांच्या नागरिकांसाठी महिन्या-दीडमहिन्यापूर्वी राहाता ग्रामीण रुग्णालयामध्ये राहाता व शिर्डीसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली होती. पहिला डोस कोव्हॅक्सीन व कोविशिल्ड देण्यात आला. आता कोव्हॅक्सीनचे डोस शिल्लक नाही. 45 दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटून गेले तरी दुसरा कोव्हॅक्सीनचे डोस मिळत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयात हेलपाटे मारताना दिसत आहे.

- Advertisement -

केंद्र व राज्य सरकारने सुरुवातीला 60 पेक्षा व नंतर 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली. यात काहींना कोव्हॅक्सीन तर काहींना कोविशिल्ड देण्यात आली. या लोकांनी लस घेतल्यानंतर त्यांच्या अनुभवावर इतर सुद्धा लस घेण्यासाठी प्रवृत्त झाले. ज्या नागरिकांनी सुरुवातीला लसीकरण मोहिमेचा चांगला प्रचार केला त्यांनाच 45 दिवस तर काही लोकांचे त्या पेक्षा जास्त दिवस होऊनही कोव्हॅक्सीन लस मिळेनासे झाल्यामुळे ते चांगलेच हवालदिल झाले आहेत.

काहींनी आम्ही पुन्हा बाधित होणार तर नाही ना अशी शंका उपस्थित केली. सरकारने लस घेण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी जे अ‍ॅप दिले आहे त्या अ‍ॅपवर गुजरात राज्य टाकल्यावर येथील जिल्ह्यातील कित्येक केंद्रावर कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध असल्याचे दिसते. मग आपल्या राज्यात लस घेण्यासाठी एवढी कसरत का करावे लागत आहे.

त्यातच 1 मे पासून 18 ते 44 वय असलेल्यांना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. त्यांना कोव्हॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यामुळेसुद्धा ही लस मिळणे अवघड झाले. लस सर्वांना देणे गरजेचे आहे परंतु ज्यांचा पाहिला डोस दिला त्यांना क्रमप्राप्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी ज्येष्ठांची माफक अपेक्षा आहे. यावर प्रशासन योग्य उपाययोजना करेल, अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नसावी.

लस घेण्यासाठी हे ज्येष्ठ नागरिक सकाळीच घराबाहेर पडत आहे. आज तरी आपल्याला लस मिळेल अशी भाबडी आशा ठेवत ग्रामीण रुग्णालयाच्या दारात बसून लसीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत बसतात. सकाळी आरोग्य केंद्राचे कर्मचारी आल्यानंतर उपाशीपोटी बसलेल्या जेष्ठ सांगितले जाते आज कोव्हॅक्सीन किंवा कोविशिल्ड आलेले नाही केव्हा येईल याची विचारणा केल्यास माहिती नसल्याचे सांगितले जाते. इतर तालुक्यात कोव्हॅक्सीनचे डोस मिळत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रशासना विरोधात रोष आहे.

ज्या दिवशी कोव्हॅक्सीन व कोविशिल्ड लस असते तेव्हा नंबर प्रमाणे टोकन दिले जाते. त्यामुळे गर्दी होत नाही. त्यामुळे करोना संसर्ग रोखण्यास मदत होत आहे असे नियोजन ग्रामीण रुग्णालय तर्फे करण्यात येते.

माझे वय 61 वर्षाचे आहे. पाच ते सहा वेळा ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी गेलो. कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेऊन 45 पेक्षाही जास्त दिवस झाले आहेत. तरी दुसरा डोस मिळत नाही. डोस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. सतत हेलपाटे मारणे आम्हाला शक्य होत नाही.

– दादासाहेब गाढवे

कोव्हॅक्सीन व कोविशिल्ड गेल्या काही दिवसापासून उपलब्ध होत नाही. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळत नसल्याने मानसिक त्रास होत आहे. लस तात्काळ उपलब्ध करून द्यावी.

– हेमंत सदाफळ, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या