अटी, शर्तींचे उल्लंघन; तीन दुकाने सील

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

मनपा अतिक्रमण विभागाने अटी व शर्तींचे उल्लंघन करणार्‍या तीन दुकानदारांविरोधात कारवाई करीत तीन दुकाने सील केल्याची कारवाई

उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी करण्यात आली. तसेच अनधिकृतपणे व्यवसाय करणार्‍या 124 हॉकर्सना सज्जडपणे तंबी देण्यात आली.

भंगार बाजाराच्या कारवाई नंतर दुकाने सील वगैरे अशी कोणतीच कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अतिक्रमण विभागाचे काम थंडावले की काय अशी चर्चा असतांनाच अतिक्रमण विभागाने पुन्हा कारवाईचा धडाका सुरू केला.

सोमवारीच आपले पथक सज्ज ठेवित आकाशवाणी चौक, काव्य रत्नावली चौक , गिरणा टाकी परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सार्‍यांचेच लक्ष लागून होते.

काव्यरत्नावली चौकात बूथ सील

शहरातील वर्दळीच्या असलेल्या काव्य रत्नावली चौकात एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या बूथलाही सील करण्यात आले.

या बूथवर दूध विक्रीची रितसर परवानगी काढलेली होती. मात्र येथे पाहणीअंती दूध व्यतिरिक्त इतरही वस्तू विक्री केल्या जात असल्याचे आढळून आल्याने बूथ सील करण्यात आले. इतर वस्तू विक्रीबाबत परवानगी नसल्याचे आढळून आले आहे.

आकाशवाणीजवळ रात्री दुकान सुरू

शहरातील वर्दळीच्या असलेल्या आकाशवाणी चौकाजवळ अग्रवाल चाट नावाचे दुकानावर कारवाई करण्यात येवून ते सील करण्यात आले. हे दुकान रात्री 9 नंतर सुरू असल्याचे आढळून आले.

या दुकानावर रात्री 9 नंतरही गर्दी दिसून आली. तसेच रात्री 9 पयर्र्त व्यवसाय करण्यास अधिकृतपणे परवानगी आहे. त्यानंतर दुकान सुरू असल्याने अटी व शर्तींचे व नियमांचे उल्लंघन झाले आहे.

यासह अन्य एक दुकान असे एकूण 3 दुकाने सोमवारी उपायुक्त वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारवाईत सील करण्यात आली.

गिरणा टाकी परिसरात हॉकर्स हटवले

गिरणा टाकी परिसराकडे अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा वळविला. गिरणा टाकी मागे असलेल्या 124 खोल्या असलेल्या भूखंडावर काही हॉकर्स आपला व्यवसाय करीत होते.

या ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी नसतांनाही या ठिकाणी अनेक हॉकर्स व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्याने त्यांना हटवण्यात आले तसेच यापुढे न बसण्याची सज्जडपणे तंबी उपायुक्त वाहुळे यानी दिली. या कारवाईप्रसंगी अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, सुनील पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.

सुभाष चौकात कारवाई

शहरातील सुभाष चौक परिसरात तसेच काशीनाथ लॉजजवळ कारवाई करण्यात आली. काही दुकानदार रस्त्यावरच जागा व्यापवून व्यवसाय करीत आहेत.

तसेच रस्त्यावर व्यवसाय न करता साईडला एका कोपर्‍यात बसून व्यवसाय करण्याचे सांगितले. यावेळी काही विक्रेत्यांचा भाजीपाला उचलण्यात आला. काही हातगाड्यांसह भाजीपाला उचलण्यात आला.

मात्र नंतर काही काळाने पावती फाडून दंडात्मक कारवाई करुन भाजीपाला सोडण्यात आल्याची माहिती या विभागाने दिली. अतिक्रमण विभागाचे नाना कोळी, किशोर सोनवणे, भानुदास ठाकरे आदी उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *