Thursday, April 25, 2024
Homeनगरउत्पन्न वाढीसाठी शेतीला मधुमक्षिका पालनाची जोड देणे आवश्यक- सहाणे

उत्पन्न वाढीसाठी शेतीला मधुमक्षिका पालनाची जोड देणे आवश्यक- सहाणे

अकोले |प्रतिनिधी| Akole

शेती क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करुन शेतकरी आर्थिक सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी शेतीला मधुमक्षिका पालनाची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल (डहाणू) येथील पिक संरक्षण व किटकशास्त्राचे शास्त्रज्ञ प्रा.उत्तम सहाणे यांनी केले.

- Advertisement -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा.सहाणे बोलत होते. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जे.डी.आंबरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य डॉ.भास्कर शेळके, शेती अभ्यासक रामलाल हासे यांचे उपस्थितीत करण्यात आले. अस्पायर संशोधन प्रकल्पांतर्गत वाणिज्य विभागातील प्रा.देवदत्त शेटे हे जून 2019 पासून हे या प्रकल्पाचे संशोधन करीत आहेत.

हा प्रकल्प राबविताना अकोले तालुक्यातील पश्चिम घाटाशी संलग्न धामणवन, खडकी, वांजुळशेत, पिंपरी, पुरुषवाडी, माळेगाव, कोदणी, वाकी या भागातील शेतकर्‍यांना मधुमक्षिका पालनासाठी 40 मधपेट्या व इतर आवश्यक साहित्य पुरविण्यात आले असून गतवर्षी प्रत्यक्ष मध उत्पादन घेण्यात आले आहे.

या जोड व्यवसायातून मधाबरोबरच कलिंगड या पिकाचे उत्पादन दुपटीने वाढून गुणवत्तेत वाढ झाल्याचे शेतकरी संतोष बारामते यांनी सांगितले. त्याचबरोबर या भागातील शेतकर्‍यांनी मधुमक्षिका पालनासाठी मोहरी, सूर्यफुल, तीळ, काळी मिरी या पिकाची लागवड करुन शेती उत्पादन व मध उत्पादन घेताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी सदर कार्यशाळेत शास्त्रज्ञ प्रा.उत्तम सहाणे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष जे.डी.आंबरे पाटील यांनी सदर प्रकल्पांतर्गत भविष्यात अधिक सखोलतेने व व्यापक स्वरुपात काम करण्याच्या सूचना केल्या तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर शेळके यांनी यावर्षी सदर प्रकल्पाच्या लाभार्थी शेतकर्‍यांना मध उत्पादनाबरोबरच त्याच्या विपणनासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

सामाजिक क्षेत्रात काम करणारे निवृत्त शिक्षक व शेतीचे अभ्यासक रामलाल हासे यांनी अकोले तालुक्यात मधमाशी पालनासाठी खूप संधी असल्याचे सांगत प्रा.देवदत्त शेटे यांच्या संशोधन प्रकल्पाचे कौतुक केले.

या प्रशिक्षण शिबिरास तालुक्यातील आदिवासी भागातील बहुसंख्य शेतकरी तसेच महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.एस.ए.पाळंदे, प्रा.डॉ.महेजबिन सय्यद, प्रा.गणेश भांगरे, भुगोल विभाग प्रमुख डॉ.शिवाजी खेमनर, डॉ.सुरिंदर वावळे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.श्रीमती सुरेखा गुंजाळ, प्रा.राहुल वाघमारे, प्रा.सुशिल चव्हाण, प्रा.दीपक देशमुख, स्टाफ सेक्रेटरी प्रा.सोपान साळवे, प्रबंधक सिताराम बगाड उपस्थित होते. सुत्रसंचालन विद्यार्थिनी तेजस्विनी दातखिळे हिने केले. आभार प्रा.देवदत्त शेटे यांनी मानले. शिबीर यशस्वीतेसाठी सिध्दार्थ निळे, हर्षदिप डावरे, सुमित सगर या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या