Wednesday, April 24, 2024
Homeनगरआरटीईमधून प्रवेश मिळूनही कोटा मेंटॉर्स स्कूलमधून फीचा तगादा

आरटीईमधून प्रवेश मिळूनही कोटा मेंटॉर्स स्कूलमधून फीचा तगादा

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये गरीब मुलांना आरटीईमधून प्रवेश होऊनही पालकांना फीची मागणी करून लूट केली जात असल्याची तक्रार पालकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

- Advertisement -

शिक्षणाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात पालकांनी म्हटले आहेकी, त्यांचा मुलगा हा कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये दुसर्‍या इयत्तेत शिकत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) त्याचा प्रवेश झालेला आहे. या कायद्यान्वये या विद्यार्थ्यांची शिकवणी शुल्क ही शासनाकडून भरली जाते. तरीही कोटा मेंटॉर्स स्कूलमधून शैक्षणिक शुल्काच्या वसुलीसाठी शाळेमधून तगादा लावला जात आहे. 24 ऑगस्ट 2023 रोजी 12.10 वाजता अशोक आजबे नावाच्या व्यक्तीने पालकांना कॉल करून तुमच्या दुसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची 13000 रुपये फी तात्काळ भरून टाका, त्यातील 7000 रुपये फी आता लगेच भरावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे या शाळेमधून फीच्या नावाखाली पालकांची नियमबाह्य पद्धतीने आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार देण्यात आली आहे.

याच शाळेतून शालेय गणवेश तसेच पुस्तके यांची सक्तीने खरेदी करायला लावली गेली आहे. त्यानुसार गणवेश तसेच पुस्तके शाळेमधून खरेदी करण्यात आले. या खरेदी वेळी शाळेकडून पावती देण्यात आलेली नाही. कोणतेही शुल्क आकारल्यानंतर पालकांना विहित नमुन्यातील पावत्या या शाळेमधून दिल्या जात नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या सर्व प्रकाराची महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग तसेच शिक्षण विभागाकडून संस्था, प्राचार्य व शालेय व्यवस्थापनाच्या कामकाजाची सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी करण्यात आली आहे.

मुलांना मानसिक त्रास

शिक्षण विभागाकडे शाळेतील गैरकारभाराविषयी तक्रार केल्यानंतर सबंधीत पालकांच्या पाल्यास शाळेमधून मानसिक त्रास व सापत्न वागणूक िदिली जाते. त्यामुळे याबाबतही शिक्षण विभागाकडून शालेय प्रशासनास योग्य सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

याबाबत कर्जतचे गटशिक्षणाधिकारी देवराम लगड यांना विचारले असता त्यांनी, पूर्ण माहिती घेवून योग्य कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या