Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकखावटीमुळे हैराण, आता शिक्षण सेतूचा ताण

खावटीमुळे हैराण, आता शिक्षण सेतूचा ताण

नाशिक | Nashik
खावटी अनुदान योजनेच्या सर्व्हेमुळे हैराण झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आता शिक्षण सेतू अभियानाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

खावटीचे किराणा किट तसेच शैक्षणिक साहित्यासह सकस आहार पोहोचविण्याचा भारही या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर आहे.करोनामुळे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधून नियमित शिक्षण केव्हा सुरू होणार, याविषयी अनिश्चितता आहे.

- Advertisement -

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी आश्रमशाळा नियमित सुरू होईपर्यंत ‘शिक्षण सेतू अभियान’ राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य व पोषण आहार पोहोचविणे तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाययोजना करून अभियान यशस्वी करण्याची कामे शिक्षकांवर असणार आहेत.

दुसरीकडे करोनामुळे आदिवासी नागरिकांसाठी राबविल्या जात असलेल्या खावटी अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील दोन हजार रुपयांचा किराणा माल देण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या कामांत प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व्यस्त आहेत. त्यातच आता शिक्षण सेतू अभियानाच्या कामांसाठी या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान, शिक्षण सेतू अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प स्तरावर समिती गठीत करण्यासह इतर कामांना प्रारंभ झाला आहे.

खावटी अनुदान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीसह शिक्षण सेतू अभियानाच्या कामाचा दुहेरी बोजा सहन करावा लागणार असल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

खावटी योजना आणि शिक्षण सेतू अभियानाच्या कामामुळे शिक्षक-शिक्षकेतरांना आरोग्याच्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वीही विमा संरक्षण, आरोग्यविषयक साहित्य नसताना शिक्षकांकडून करोनाची कामे करून घेण्यात आली. शिक्षक हा बुध्दिजीवी असून, कामगार नाही. त्यांना शाळाबाह्य कामे देऊ नये.
– भरत पटेल, अध्यक्ष, स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या