Thursday, April 25, 2024
Homeनगरशाळेतील मुलांच्या भांडणातून पालकांत वाद

शाळेतील मुलांच्या भांडणातून पालकांत वाद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोकनगर येथील एका संस्थेच्या माध्यमिक शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर दोन्ही पालकांच्या मारामारीत झाले. या वादाचे परिणाम थेट दोन्हीकडील जमाव जमल्याने काही काळ अशोकनगरमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूकडील समाजाचा जमाव जमल्याचे समजताच तात्काळ शहर पोलीस स्टेशनचा ताफा हजर झाला. त्यामुळे दोन्ही समाजाचे समजदार कार्यकर्ते व पोलीस प्रशासन यांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला.

- Advertisement -

काल एका माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी मध्ये शिकणार्‍या दोन विद्यार्थ्यांचे किरकोळ वाद झाले होते. यानंतर एका समाजाच्या विद्यार्थ्यांने हा प्रकार दुसर्‍या दिवशी आपल्या पालकांना सांगितल्याने त्या पालकांनी सदरचा प्रकार शिक्षकांना न सांगता परस्पर शाळेतील वर्गात जाऊन रागाच्या भरात त्या विद्यार्थ्याच्या कानामागे मारली. सदरच्या पालकांनी परस्पर वर्गात जाऊन अल्पवयीन विद्यार्थ्याला मारल्याने दुसर्‍या विद्यार्थ्यांचेही पालक त्या ठिकाणी आल्याने दोन्ही पालकांचे वाद होऊन हा जमाव चौकात जमा झाला होता. परंतु अशोकनगर मधील समजदार लोकांनी एकत्र येऊन हा वाद मिटवल्याने तसेच पोलिसांचा ताफा वेळीच आल्याने लहान मुलांच्या भांडणातून निर्माण झालेला तणाव शांत करण्यास पोलिसांना यश आले.

अशोकनगर येथील पोलीस चौकी ही गेल्या तीन वर्षांपासून हरेगाव फाटा येथे पोलीस निवारा केंद्र उघडल्यापासून बंदच ठेवण्यात आली आहे. सदरच्या ठिकाणी अनेकदा चोर्‍या, हाणामार्‍या, टारगटांकडून महिला-मुलींची छेडछाड, अवैध व्यवसाय आदी प्रकार वाढत चाललेले आहेत. असे असतानाही सदरच्या ठिकाणी अधिकृत असलेल्या पोलीस चौकीत पोलीस थांबत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळी आंदोलने केलेली आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष झालेले आहे. यासंदर्भात त्वरित वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून अधिकृत असलेल्या अशोकनगर पोलीस चौकीत सजेच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांना तेथे उपस्थित राहण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तसेच याठिकाणी महाविद्यालय असल्याने रोडरोमिओंचा या परिसरात सुळसुळाट असतो. त्यामुळे ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थिनींना याचा मोठा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या