Friday, April 26, 2024
Homeनगरखासगी, मालवाहू वाहनातून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

खासगी, मालवाहू वाहनातून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

खरवंडी कासार (वार्ताहर)

जुन महिन्यांत शाळा उघडल्यानंतर ग्रामीण भागातून पाथर्डी शहरातील विविध मराठी व इंग्रजी माध्यमांच्या विद्यालयात ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. हे विद्यार्थी दररोज 25 ते 30 किलोमीटर अंतरावरून खासगी वाहनातून धोकादायक पध्दतीने प्रवास करत आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे यात काही मालवाहू वाहने तर खासगी प्रवासी वाहनांचा समावेश आहे. पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास अपघात होवून विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

शाळा सुरू झाल्या असून अद्याप ग्रामीण भागात एसटीची वाहतूक सुरळीत झालेली नाही. याचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहतूक करणारे 50 ते 60 विद्यार्थ्यांना एकाच वाहनात कोंबून प्रवास करत आहे. यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे पाथर्डी पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या नाकावर टिचून मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून पोलिस स्टेशन समोरून वाहतूक सुरू आहे.

तर खासगी माल वाहतूक करणार्‍यांकडे आटीओ विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. पाथर्डीच्या पूर्व भागातील खरवंडी कासार ते पाथर्डी, अकोला ते पाथर्डी, मोहोळ, देवडे, जांभळी ते पाथर्डी, तिसगाव ते पाथर्डी, अमरापूर ते पाथर्डी, करंजी ते पाथर्डी, दत्तनांदूर, कोरडगाव ते पाथर्डी अशा ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी खाजगी वाहनातून पाथर्डी येथील विविध शाळांमध्ये येत आहेत.

यातच पाथर्डी तालुक्यातून जात असलेला कल्याण-विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट झालेले असून जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. तर पावसामुळे रस्त्याची दुरावस्था यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविकास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैध खाजगी विद्यार्थी वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी पाथर्डी शहरातील विद्यालयात खाजगी वाहनांमधून येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारे खाजगी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. अशा वाहनांवर कारवाईसाठी पाथर्डी वाहतूक पोलीस व नगर आरटीओ विभागाकडून पथक तयार करून खडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पालकांनी शाळेची स्कूल बस किंवा एसटी महामंडळामार्फतच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे.

उर्मिला पवार, आरटीओ अधिकारी नगर

- Advertisment -

ताज्या बातम्या