पोहण्यास गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यु

jalgaon-digital
2 Min Read

लक्ष्मण पवार । हतगड l Hatgad

तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाणारे घागबारी जवळील वटाबारी (संजय नगर) येथे एका शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तो मुखेड येथील आश्रम शाळेत दहाव्या इयत्तेत शिकत होता.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी (ता. 20) रोजी सप्टेंबर रोजी अडीच वाजेच्या सुमारास तीन ते चार शाळकरी मुले गावाजवळील तलावात पोहण्या करीता गेले होते.

तलावाच्या एका तिरावरुन दुस-या तिरावर पोहत पोहचण्याच्या नादात मयत भावेश तुकाराम गावित वय 16 हा पाण्यात मध्यभागी आल्यावर दम लागल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. एकाने त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र खोली जास्त असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले.

बाकीची मुले पोहत दुस-या काठावर पोहचली. भावेश हा सर्वांच्या मागे असल्याने तो मध्यभागी येऊन बुडाला. सोबतीला असणा-यांनी तातडीने ग्रामस्यांना सांगितले. तलावाची खोली जास्त असल्याने तो सापडला नाही. सोमवारी (ता. 21) रोजी कळवण तालुक्यातील बोरदैवत येथील पोहण्यात पटाईत असलेले पाणबुडे मच्छीमार यांना पाचारण करण्यात आले.

त्यांना जाळे, आकडे, गळ व मांजरीच्या साहाय्याने दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान मृतदेह शोधण्यास यश आले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते मोहन गांगुर्डे, शास्त्री गावित, हरीभाऊ भोये, चिंतामण गायकवाड, तुळशिदास पिठे, गोपाळ गायकवाड, एकनाथ गांगुर्डे, आदींनी सहकार्य केले.

याबाबत पोलीस पाटील पुंडलिक गावित यांनी खबर दिली असून आकस्मिक घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडके, पोलिस हवालदार चंद्रकांत दवंगे, पराग गोतुरणे, एस.एल. गांगुर्डे अधिक तपास करीत आहेत. गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *