परीक्षांचे वेळापत्रक नव्याने होणार जाहीर

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई – कोरोनाला रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी जाहीर केले. त्यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

ते म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेल कडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करून घेण्यात येथील. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठांचे कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी संगितले.

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर अकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारासंदर्भातील चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचनाही सामंत त्यांनी दिल्या.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी अशा प्रकारची लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासन,राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येथील याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

एनएसएस विद्यार्थ्यांची घेणार मदत – आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का याचा सर्व विद्यापीठाने विचार करावा. काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एक प्रयोग सुरू केला आहे. एनएसएसच्या 27 विद्यार्थ्यांना आईवडिलांकडून परवानगी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी सज्ज केले. याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा एनएसएसचे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी घेता येतील का या साठीचा अहवाल सादर करावा आशा सूचनाही सामंत यांनी कुलगुरूंना केल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *