Wednesday, April 24, 2024
Homeनगरअनुसूचित जातीसाठी अबकड प्रवर्ग लागू होणार

अनुसूचित जातीसाठी अबकड प्रवर्ग लागू होणार

बोधेगाव |वार्ताहर| Bodhegav

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीसाठी भटक्या विमुक्त जाती प्रमाणे अबकड प्रवर्ग लागू करून अनुसूचित जातीमध्ये येणार्‍या वेगवेगळ्या जातींना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे बहुजन रयत परिषदेने केली आहे. त्याला ठाकरे यांनी तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री आणी बहुजन रयत परिषदेचे संस्थापक प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली.

- Advertisement -

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त बहुजन रयत परिषदेचे नवनिर्धार संवाद अभियान माजी मंत्री ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाले. यावेळी ढोबळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अस्थी स्थळाचे दर्शन घेतले त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ढोबळे म्हणाले, महाराष्ट्रात दलितांची 1 कोटी 32 लाख लोकसंख्या आहे. बौद्धांची 65 लाख, हिंदू दलितांची 67 लाख लोकसंख्या आहे. यामध्ये दलितांच्या विकास कामात एकूण दोन भाग पडतात. एक अती मागास भाग आणि प्रगत भाग प्रगत भागात शिक्षण, नोकरी आणी व्यवसायामध्ये प्रगत असाणारा भाग असे माजी न्यायमूर्ती बी. एन. लोकुर आणि न्यायमूर्ती मेहरा म्हणतात, त्यामुळे बौद्धांना अ, 30 लाख मातंगाना ब, होलार, मोची, चर्मकार आणि ढोर यांचा क आणि 54 जाती ज्या मायक्रो आहेत.ज्यांची लोकसंख्या 12 लाख आहे, त्यांचा ‘ड’ वर्गात समावेश करावा.

याबाबत तामीळनाडूचे मंदाकृष्ण मादेगा यांनी आठ राज्यांत ही चळवळ उभी केली आहे. 12 राज्यांची त्याला अनुकुलता आहे. या विषयावर सदनामध्ये सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती ढोबळे यांनी दिली. तर बोधेगाव येथे ज्याठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या अस्थी आहेत. त्याठिकाणी एका वर्षाच्या आत स्मारक उभारू असे सांगितले. यावेळी ढोबळे यांच्या सोबत महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. कोमल साळुंके, ईश्वर क्षीरसागर, दत्ता पाटील, प्रकाश गायकवाड, विशाल खंदारे, विनीत जाधव, मनीषा खरात, निशा सिंग अजय भारस्कर, विठ्ठल मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बोधेगाव येथे सरपंच सुभाष पवळे, ग्रामपंचायत सदस्य फिरोज खान, अस्थी समिती अध्यक्ष भगवान मिसाळ, संतोष बानाईत, बन्सी मिसाळ, बाबासाहेब पवळे, दत्ता मिसाळ, पवन मिसाळ यांनी ढोबळे यांचे स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या