Saturday, April 27, 2024
Homeनगरसावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली : सौ. दुर्गाताई तांबे

सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली : सौ. दुर्गाताई तांबे

संगमनेर (प्रतिनिधी) –

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ व आहिल्याबाई होळकर यांचा वारसा महिला समर्थपणे चालवत असून समाजाला दिशा देण्याचे काम

- Advertisement -

महिलांनी केले आहे. सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे. करोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील महिला डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, पोलीस यांनी खुप अथक परिश्रम घेतले. क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली होऊन त्या आज सक्षम झाल्याचे गौरवोद्गार नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी काढले आहेत.

संगमनेर नगरपालिकेच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कोव्हिड योध्दा सन्मान सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. जयश्री थोरात, डॉ.शालिनी सचदेव या प्रमुख पाहुण्यांसह उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, शमा शेख, सुहासिनी गुंजाळ, रुपाली औटी, मालतीताई डाके, सुनंदा दिघे, सुमित्रा दिड्डी, मनीषा भळगट, किशोर पवार, राजेंद्र वाकचौरे, गजेंद्र अभंग, नुरमोहम्मद शेख, बाळासाहेब पवार, शैलेश कलंत्री, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरातील करोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या 188 महिला डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली आहे. आज सर्वच क्षेत्रांत महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असून त्यांनी आपले कर्तृत्व कामातून दाखवून दिले आहे. आपल्यातील कलागुणांना वाव दिला आहे. विविध कला आत्मसात करून उच्च शिक्षण घेऊन मुली देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत. कोव्हिडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील महिला, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी खूप योगदान दिले आहे. संगमनेर शहरातील सफाई कामगार महिलांनी करोना काळात कोणतीही तक्रार न करता काम केले. नगरपालिकेच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस यांनीही कोव्हिड काळात खुप उत्तम काम केले आहे. म्हणून आम्ही कर्तव्य म्हणून त्यांचा सन्मान आज करतो आहे. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करोना काळात खूप काम केले गेले. आजही ही लढाई सक्षमपणे सुरू असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

डॉ. शालिनी सचदेव म्हणाल्या, आपल्या समाजात स्त्रीला शक्ती म्हणून संबोधले जाते. पुरुषापेक्षा स्त्री कमी नाही. महिलांनी करोना काळात प्रत्येक क्षेत्रात आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. करोना संपलेला नाही तर त्याचा प्रभाव कमी झाला आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, आजच्या युगात स्त्री स्वत:च्या पायावर उभी राहू शकते. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. अन्यायाविरोधात लढा उभारू शकते हे केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रतिक आहे. 2020 हे वर्ष आपल्यासाठी लढाईमध्येच गेले. करोना काळात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस यांनी खुप परिश्रम घेतले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे, आहाराकडे लक्ष दिले पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्पा देशमुख, भरत गुंजाळ, उमेश ढोले, रमेश ताजणे, गौरव मंत्री यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या