Wednesday, April 24, 2024
Homeनगरसावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम मुदतीत दर्जेदार करा - आ. काळे

सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम मुदतीत दर्जेदार करा – आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून 191 कोटी निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम दिलेल्या मुदतीच्या आत दर्जेदार करून नागरिकांना व वाहतुकीला अडचण येणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी एस. ए. यादव कंपनीच्या अधिकार्‍यांना दिल्या.

- Advertisement -

आ. काळे यांनी सोमवारी एन.एच. 752 जी. या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरु असलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांकडून त्यांनी सावळीविहीर ते कोपरगाव तालुक्याच्या हद्दीततील येवला नाका पर्यंत सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु असतांना अहमदनगर-मनमाड मार्ग सावळीविहिरपासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच. 752 जी क्रमांक देण्यात येवून सिन्नर, शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग 160 मंजूर करण्यात आल्यामुळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे भविष्य टांगणीला लागले होते.

या रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने 191 कोटी निधी मिळविण्यात यश मिळून या रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये व वाहन चालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

हे काम मुदतीचे आत गुणवत्तापूर्ण करावे. लगतच्या गावातील पाणी पुरवठ्याच्या व शेतकर्‍यांच्या पाईपलाईनचे तसेच गोदावरी कालव्यांच्या वितरीकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. यदाकदाचित नुकसान झाल्यास तातडीने दुरुस्ती करा. तसेच साई भक्तांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी या महामार्गावर पुणतांबा चौफुली व बेट नाका या ठिकाणी बांधण्यात येणारे पब्लिक अंडरपास (भुयारी मार्ग), राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम याठिकाणी पेड्स्टल अंडरपास (भूमिगत पादचारी मार्ग) तसेच भूमिगत चार्‍यांचे 5 भुयारी मार्ग आदीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करताना त्या प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला द्या. त्यांच्यावर अन्याय होवू देवू नका. कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास तातडीने माझ्याशी संपर्क करा, आपणास सर्वोतोपरी मदत करु, अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या