सावळीविहीर, निमगाव, रूईत सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने भावी सरपंचांची वाढली गर्दी

सावळीविहीर |वार्ताहर| Savali Vihir

राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. सावळीविहीर परिसरातील निमगाव,

सावळीविहीर खुर्द व बुद्रुक येथील सरपंच सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण निघाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून अत्तापासूनच जोरदार तयारी करण्यासाठी अनेक भावी सरपंच कामाला लागले आहेत.

निमगाव, सावळीविहीर खुर्द, सावळीविहीर बुद्रुकमध्ये सर्वसर्वसाधारण तर रुई ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महीला, निघोज अनुसूचित जमाती महिला जागेसाठी राखीव निघाले आहे. पैकी शिंगवे व सावळीविहीर खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. तेथील सरपंच पदाची निवड येत्या 10 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.

सावळीविहीर खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून अशोकराव जमधडे व महेश जमधडे यांच्या गटाला सहा तर सागर भदे गटाला पाच जागा मिळाल्या आहेत. तेथे जमधडे गटाचा सरपंच होणार असून सर्वसाधारण पुरूष जागेवर महेश जमधडे हे निवडून आले आहेत. पण त्यांनी नकार दिल्यास ना.मा. प्रवर्ग जागेवर निवडून आलेले माजी सरपंच अशोकराव जमधडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

सावळीविहीर, निमगाव, निघोज, रुई या ग्रामपंचायतीची मुदत अजून सुमारे दोन वर्षे आहे. सर्वसाधारण जागेसाठी सरपंचपद आरक्षित झाल्याने भावी सरपंचाची मोठी वाढ होताना दिसत आहे. यासाठी दोन वर्षे तयारी करण्यासाठी वेळ मिळाला असून अनेकांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केल्याचे चित्र पहायला मिळते आहे.