Tuesday, April 23, 2024
Homeनगरसत्संग कार्यक्रमात सहा महिलांचे दागिने चोरले

सत्संग कार्यक्रमात सहा महिलांचे दागिने चोरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्‍या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यांनी मंगळवारी येथील रेसीडेन्शीअल कॉलेजच्या मैदानात स्वामी समर्थ गुरूमाऊली यांच्या भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळा व अमृततूल्य हितगुज मेळाव्यात चांगलीच हातसफाई केली. सहा महिलांच्या गळ्यातील सुमारे 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

- Advertisement -

याप्रकरणी निर्मला दत्तात्रय दारकुंडे (वय 68, रा. नगरी चौक, पाईपलाईन, सावेडी) व पद्मा अविनाश बोडखे (वय 63 रा. विठ्ठलनगर, पाईपलाईन, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. सत्संग सोहळा दुपारी एक वाजता संपल्यानंतर दीड वाजेच्या दरम्यान सोहळ्याशेजारीच प्रसादाची व्यवस्था केली होती. प्रसादाच्या स्टॉलवर मोठी गर्दी झाली.

या गर्दीचा फायदा सोनसाखळी चोरट्यांनी उठविला. त्यांनी निर्मला दारकुंडे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन लंपास केली. दारकुंडे याच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आयोजकांना याबाबत माहिती दिली. यानंतर तेथे इतर महिला दाखल झाल्या. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.

या महिलांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. रेणुका मुकेश दौंड (रा. भिस्तबाग चौकजवळ, सावेडी) यांच्या गळ्यातील आठ ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण चोरीला गेले आहे. चित्रा विजय तोटे (रा. यासिननगर, कर्जत) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण चोरीला गेले आहे. कल्पना सतीश सोन्नीस (रा. हनुमाननगर, अरणगाव ता. नगर) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण चोरीला गेले. छाया प्रभाकर गवांदे (रा. आसरा सोसायटी, गुलमोहोर रोड, सावेडी) यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चेन चोरीला गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान पद्मा अविनाश बोडखे यांनी स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन चोरीला गेली असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. एकाच वेळी सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, तोफखान्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांनी दागिने चोरून घटनास्थळावरून तत्काळ पोबारा केला. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवर स्वामी समर्थ गुरूमाऊली यांच्या भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळा व अमृततूल्य हितगुज मेळावा झाला होता. यावेळी देखील तीन ते चार महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यातील आरोपी अद्याप शोधले गेले नसतानाच पुन्हा सत्संग सोहळ्यातून सहा महिलांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या