Saturday, April 27, 2024
Homeनगरतहसीलदार झालो, आता ध्येय आयएएस

तहसीलदार झालो, आता ध्येय आयएएस

सचिन दसपुते

अहमदनगर – गेल्या तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. कायमच परीक्षेत अपयश येत होते, आता समाधानकारक पद मिळाल्याने समाधान आहे. आईवडिलांच्या कष्टाचे व माझ्या मेहनतीने फळ मिळाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी सुरू आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तीन मुख्य परीक्षांत अपयश आले असले तरी पुन्हा जोमाने तयारी करीत असून, पुढील ध्येय आयएएस होण्याचे असल्याचे तहसीलदारपदी निवड झालेले अक्षय रासने यांनी ‘सार्वमत’बरोबर बोलताना सांगितले.

- Advertisement -

जामखेड तालुक्यातील खर्डा गावचे अक्षय रासने यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने तहसीलदारपदी निवड झाली. निवडीनंतर ते म्हणाले, नगर येथील न्यू आर्ट्स ज्युनिअर कॉलेजला असताना स्पर्धा परीक्षेविषयी माहिती मिळाली; परंतु, त्यावेळी हेच करायचे हे नक्की नव्हते. मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पदवी शिक्षण घेण्यासाठी पुणे गाठले.

पुणे स्पर्धा परीक्षांचे मोठे केंद्र आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेविषयी चांगली माहिती मिळाल्याने आवड निर्माण झाली. या क्षेत्रात करिअर करू शकतो, असे वाटले. पुण्यात मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे मी स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरविले. अभ्यासाला सुरुवात केली. तीन ते चार वर्षे सातत्याने अभ्यास करीत आहे. अनेक वेळा अपयश आले, कधी हुलकावणी दिली. परंतु, अभ्यास करत राहिलो.

माझ्यावर माझ्या आई-वडिलांचा व कुटुंबातील सदस्यांचा विश्वास होता. त्यांनी माझा वेळ मला दिला. त्यांचे मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभले. माझ्या शैक्षणिक जीवनात सर्व शिक्षकांनी योग्य वाट दाखवली, त्यांनी अनमोल मार्गदर्शन केले. माझे मित्र, सिनिअर यांनीही मार्गदर्शनाबरोबर वेळोवेळी मदत केल्याने हे यश संपादित करू शकलो. माझ्या यशामध्ये या सर्वांचा मोठा वाटा आहे. राज्यसेवा, लोकसेवा परीक्षा सातत्याने देत आहे.

तहसीलदार हे समाधानकारक पद मिळाल्याचा आनंद माझ्यासह सर्वांना झाला आहे. माझ्या कष्टाचे फळ मला मिळाले. लोकसेवा आयोगाच्या तीन मुख्य परीक्षांपर्यंत मजल मारली. परंतु मुख्य परीक्षेत अपयश आले. आता ऑक्टोबरमध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे. पुन्हा नवीन जोमाने अभ्यास करून पुढील ध्येय आयएएस होण्याचे आहे.

पूर्वी ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेविषयी जागृता नव्हती. मार्गदर्शन मिळत नव्हते. यामुळे ग्रामीण मुले स्पर्धा परीक्षेकडे कमी वळायचे. परंतु, ग्रामीण भागात बर्‍यापैकी इंटरनेटचे जाळे पसरले आहे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर इंटरनेट ही मूलभूत गरज बनली आहे. स्पर्धा परीक्षांविषयीच नाही तर सर्व विषयांची माहिती इंटरनेटवर प्राप्त होते. यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी इंटरनेटचा योग्य वापर करून अधिकारी व्हावे, असा सल्ला रासने यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या