Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसर्पमित्रांना शासकीय मदतीची गरज

सर्पमित्रांना शासकीय मदतीची गरज

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

सध्या पावसाळा सुरू असून बिळात असणारे साप बाहेर येऊ लागल्याने सर्पमित्रांची आठवण होत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता साप पकडणार्‍या या सर्पमित्रांना वनविभागाच्या कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा व मानधन नसल्याची खंत सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

एखाद्या कॉलनीत किंवा सोसायटीच्या आवारात साप आढळून आल्यास कुणा सर्पमित्राला फोन केल्यानंतर सदर परिसराच्या जवळ असलेला सर्पमित्र हा संबंधित ठिकाणी जाऊन साप पकडतो व तेथील नागरिकांना पकडलेल्या सापाच्या प्रजाती विषयी माहिती देतो. पकडलेला साप हा विषारी की बिनविषारी हे देखील लोकांना पटवून दिले जाते, त्यानंतर पकडलेल्या सापाची माहिती वनविभागाच्या कार्यालयाला दिली जाते.

यात मुख्य अडचण म्हणजे वनविभागाचे कार्यालय हे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेतच उघडे असल्याने इतर वेळी साप पकडण्याच्या नोंदीसाठी सर्पमित्रांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यानंतर पकडलेला साप हा सर्पमित्राने स्वतःच शहराबाहेर नेऊन सोडायचा असतो. त्याकरिता लागणारा वेळ आणि वाहतूक खर्च हा सर्पमित्राला स्वतःच्या खिशातून करावा लागत असल्याने सर्पमित्रांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

विदेशात आफ्रिकन देश, ऑस्ट्रेलियासह काही आशियाई देशात सर्पमित्रांना वनविभागाकडून महिन्याला मानधन दिले जाते. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटतो. यासोबतच सर्पमित्रांचा विमा काढला जातो. जेणेकरून काही दुर्घटना घडल्यास त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळू शकते. यासह साप पकडणे व तो जंगलात सोडणे याकरिता वाहतूक व्यवस्था देखील वनविभागातर्फे केली जाते. मात्र महाराष्ट्रात ही सेवा सर्प मित्रांकडून विनामूल्य करून घेतली जात असल्याची खंत सर्पमित्रांनी ‘देशदूत’शी बोलताना व्यक्त केली.

सध्या नाशिकमध्ये अर्धवट माहिती असलेले सर्पमित्रदेखील आहेत. शासनातर्फे सर्पमित्र बनण्याकरिता ठराविक लेखी व प्रात्यक्षिक स्पर्धा घेतल्यास सापाबद्दल लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल असे मत सर्पमित्र मनीष गोडबोले यांनी व्यक्त केले. समाजासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून सर्पमित्रांची ओळख आहे. मात्र हा घटकच वनविभागाने दुर्लक्षित केल्याने भविष्यात सर्पमित्रांच्या उपजीविकेचा प्रश्न तर उद्भवणार नाही ना, असा सवालदेखील आता उपस्थित होत आहे.

गेल्या तीस वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्यरत आहे. वनविभागाकडून कुठल्याही प्रकारचे मानधन मिळत नसून कुठलाही विमा शासनाने काढला नसल्याची खंत आहे. वनविभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.

मनीष गोडबोले, सर्पमित्र

नाशिक जिल्ह्यातील अधिकृत सर्पमित्र

1. मनीष गोडबोले, नवीन नाशिक, पाथर्डी – ९८५०९७९७१४

2. राहुल नाईक, द्वारका, नाशिक -९०२८१६८६५४

3. सुशांत रणशूर, ओझर व आडगाव – ९७६४८३९८२५

4. अनंत वाळे, नाशिकरोड व निफाड – ९०२८३३३३२२

5. विशाल बाफणा, पंचवटी- ९०२८२८८८५०

6. प्रमोद महानुभव, लासलगाव- ९०११७३०८८५

7. रवींद्र चावरे, उपनगर (- ९९२२३६७४६७

8. आदित्य पाटील, पिंपरी – ८६०५६०३४७६

9. गणेश शिंगाडे, पिंपळगाव – ७३८५१९५१७७

10. अमित लोखंडे, म्हसरुळ, दिंडोरी – ९९६०७३३३८३

11. सागर वाघ, वडाळागाव ९९७५१०१८९७

12. दत्ता देशमाने, गंगापूर – ८७९६९९५६९९

13. अभिजित महाले, लेखानगर- ९४२२७५०६९०

- Advertisment -

ताज्या बातम्या