Saturday, April 27, 2024
Homeनगरसराफांचा 50 लाखांचा ऐवज लुटणारे सहा आरोपी जेरबंद

सराफांचा 50 लाखांचा ऐवज लुटणारे सहा आरोपी जेरबंद

कर्जत |वार्ताहर| Karjat

नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील दोन सराफ व्यवसायिकांना दुकान बंद करून घरी जात असताना

- Advertisement -

बाबुळगावाजवळ गाडी अडवून कोयत्याने मारहाण करून 50 लाख रुपयांचा ऐवज लुटण्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली एक गाडीसह हत्यारे देखील जप्त केले असून या सर्व आरोपींना गुरुवारी (दि. 5) कर्जत येथील न्यायालयामध्ये नेले असता 9 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे

याबाबत घडलेली घटना अशी की, मिरजगाव येथील राहणारे अतुल पंडित व राहुल पंडित या दोघांचे कर्जत तालुक्यातील माहीजळगाव व चापडगाव या ठिकाणी आदित्य ज्वेलर्स या नावाने सराफ दुकाने आहेत हे दोघे रोज मिरजगाव येथून ये-जा करत असतात नेहमीप्रमाणे दुकान बंद करून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे दोघे भाऊ त्यांची वाहन एम.एच. 16, बी वाय. 4351 या चारचाकी गाडीने सोलापूर नगर महामार्गाने घरी जात असताना कर्जत तालुक्यातील बाबुळगाव या गावाजवळ पाठीमागून तीन दुचाकी गाडीला आडव्या आल्या व त्यांनी दुचाकी गाडीला आडव्या लावून गाडीकडे पळत आले.

काही समजण्याच्या आत या दोन्ही सख्ख्या भावांवर हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात धारदार शस्त्र होते. यामध्ये कोयते सत्तुरच्या सहाय्याने गाडीच्या काचा फोडल्या व राहुल पंडित यांना धारदार शस्त्राने चेहर्‍यावर जखम केली व धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेले सोने व चांदीचे दागिने व इतर ऐवज असा सुमारे 50 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला होता.

ही घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासांच्या आत कर्जतचे पोलीस व स्थानिक नागरिक यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली दुचाकी जप्त केली होती यामुळे आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांना सहज शक्य झाले.

याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव व निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. अमरजीत मोरे व पोलीस पथकाने अथक परिश्रम करून सहा आरोपींना जेरबंद केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार क्रमांक एम. एच. 14 जी एन 6569 ही देखील जप्त केली आहे या सर्व आरोपींना आज कर्जत येथील न्यायालयामध्ये हजर केले असता नऊ दिवसांची पोलीस कोठडी न्यायाधीशांनी दिली आहे.

याप्रकरणी आरोपींकडून अद्याप मुद्देमाल हस्तगत झालेला नाही. पकडण्यात आलेले आरोपी हे राज्यातील नामांकित गुन्हेगार असून त्यांचा इतरही अनेक ठिकाणी रस्ता लुटीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या