Friday, April 26, 2024
Homeनगरराहाता शारदा ज्युनिअर कॉलेजमध्ये 11 वी प्रवेशासाठी मोठा मनस्ताप

राहाता शारदा ज्युनिअर कॉलेजमध्ये 11 वी प्रवेशासाठी मोठा मनस्ताप

राहाता |वार्ताहर| Rahata

येथील शारदा ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांना दहावीचा निकाल लागून दोन महिने उलटल्यानंतरही अकरावीच्या प्रवेशासाठी वारंवार चकरा मारावा लागत आहे. जून -जुलैमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असताना ती अजूनही न झाल्याने प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करावी व पालकांकडून अप्रत्यक्षरित्या होणारी आर्थिक लूट थांबवावी. अन्यथा मनसे स्टाईलने ज्युनिअर कॉलेज संकुलाचे प्राचार्य यांना धडा शिकवू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राहाता शहराध्यक्ष विजय मोगले यांनी दिला आहे.

- Advertisement -

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विजय मोगले यांनी म्हटले आहे की, दिनांक 17 जून रोजी दहावीचा निकाल लागलेला आहे. त्यानंतर काही दिवसांतच अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होतात. मात्र महिना उलटून गेला तरी सुद्धा अनेकांचे प्रवेश डावलले जात आहे. त्याचवेळी मात्र शाळेतील जबाबदार काही लोक पालकांकडून जास्त पैसे घेऊन नॉन ग्रॅन्टेबल अ‍ॅडमिशन देत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भातील पुरावे सुद्धा मनसेकडे उपलब्ध असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने विद्यार्थ्यांचा चालवलेला मानसिक छळ तसेच विद्यार्थी व पालकांना वारंवार हेलपाटे मारूनही प्रवेश दिला जात नसल्याने लवकरच या प्रश्नी शाळा व्यवस्थापन समिती तसेच प्राचार्य यांच्या विरोधातील कैफियत सरकारी अधिकार्‍यांपुढे मांडणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

एकीकडे अ‍ॅडमिशन करायचे नाही व दुसरीकडे जास्त पैसे घेऊन प्रवेश द्यायचे. यामुळे गरिबांच्या मुलांचे नुकसान होत असून आर्थिक दुर्बल पालक वेठीस धरले जात आहेत. श्रीमंतांच्या मुलांना लगेच अ‍ॅडमिशन व गरिबांना येरझारा हा शाळा व्यवस्थापनाचा कुठला न्याय आहे, असा सवाल यावेळी मनसे पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला आहे.

शाळा व्यवस्थापनाने लवकर यामध्ये सुधारणा करावी अन्यथा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, तालुकाध्यक्ष गणेश जाधव, उपतालुकाध्यक्ष सुधाकर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष विजय मोगले यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या प्रसिद्धी पत्रकावर मनसे सैनिक प्रसाद महाले, दीपक पवार, शुभम मसने, अजिंक्य गाडेकर, विकास म्हस्के, भाऊसाहेब सोनवणे, प्रशांत वाकचौरे, संदीप लाळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या