Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान : अवनखेड ग्रामपंचायत राज्यात प्रथम

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान : अवनखेड ग्रामपंचायत राज्यात प्रथम

नाशिक । प्रतिनिधी

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ( Sant Gadgebaba Gram Swachhta Abhiyan ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2017-2018 मधील ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे ‘ चा राज्यस्तरीय निकाल शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.जिल्हयातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने ( Avankhed Grampanchayat ) या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून गुरुवारी (दि.१) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली दूरदुष्यप्रणाली व्दारे ग्रामपंचायतीला पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर ( Zilla Parishad President Balasaheb Kshirsagar) व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ( Chief Executive Officer Leena Bansod ) यांनी पुरस्कार विजेत्या गावांचे अभिनंदन केले आहे.

ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनाच्यावतीने ‘ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा ‘ राबिविण्यात येत आहे. ग्रामस्थांत स्वच्छतेची आवड निर्माण होण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले.

यामुळे गावांमध्ये स्वच्छतेसाठी स्पर्धा लागली. या अभियानाला स्वच्छ भारत अभियानाची जोड मिळाल्याने गाव हागणदारीमुक्त झाली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत घर, परिसर स्वच्छता, सजावट स्पर्धा, जागतिक हात धुवा दिन, रस्ते दुरूस्ती, स्वच्छता, सफाई, स्वच्छ जनावरे, आदर्श गोठा, पाणी शुध्दता, सांडपाणी व्यवस्थापन यासंबंधी चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सन सन 2017-2018 च्या पुरस्कारासाठी रात्यस्तरीय तपासणी समितीकडून अवनखेड ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यात आली. यात शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापन, घर, गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, लोकसहभाग आणि सामुहीक स्वयंपुढाकारातुन नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये केलेल्या कामांचे मुल्यमापन करण्यात येऊन या निकषाच्या आधारे ग्रामपंचायतींची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पुरस्कार विजेच्या गावांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली दुरदुष्य प्रणालीव्दारे होणा-या या पुरस्कार वितरण सोहळयास उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी दीड वाजता आयोजित या पुरस्कार वितरण सोहळयासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, अवन खेड ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र जाधव, ग्रामसेवक विनोद जाधव यांना उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.

अन्य गावांनीही सहभागी व्हावे-क्षिरसागर

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत रात्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे अभिनंदन. लोकसहभागातून राबविण्यात येणा-या या अभियानामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी अतिशय उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन ग्रामविकासाचा पाया मजबूत केला आहे. जिल्हयातील अन्य गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या यांनीही स्वच्छतेतून समृध्दीकडे वाटचाल करण्यासाठी स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपले गाव आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करावेत.

ग्रामपंचायतीना काम करण्याची संधी – बनसोड

स्वच्छता अभियानात नाशिक जिल्हयाने चांगले काम केले आहे. याच वर्षी केंद्र शासनाकडून याबाबत नाशिक जिल्हयाचा सन्मानही झाला असून माझी वसुंधरा अभियानाच्या पहिल्याच वर्षी नाशिक जिल्हयातीत पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातही जिल्हयातील अवनखेड ग्रामपंचायत राज्यात प्रथम येणे ही जिल्हयासाठी अभिमानाची बाब आहे. पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापन आणि लोकसहभाग या चतु:सुत्री प्रमाणे गावाने एकजुटीने काम केल्यास आदर्श गावाकडे वाटचाल करण्याची क्षमता सर्व ग्रामपंचायींकडे असून यामध्ये उत्कृष्ट काम करण्याची संधी आहे. १५ व्या वित्त आयेागातील 50 टक्के निधी हा पाणी व स्वच्छतेच्या कामांसाठीच असून यामुळे गाव स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होणार आहे.

लोकसहभागातून यशस्वी अंमलबजावणी – सरपंच नरेंद्र जाधव

गावानं लोकसहभागातून अनेक महत्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी केली असून नवनवीन संकल्पना राबवून गावाचं वेगळेपणही जपलं आहे. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानापासून सुरु झालेली ही विकास चळवळ निर्धाराने पुढे जात आहे. गावांमध्ये उत्तम आरोग्याचा प्रचार आणि विविध उपक्रमांद्वारे प्रसार करणे, यावर गावाने लक्ष केंद्रित केले आहे. आदर्श सांसद ग्राममध्येही गावाने देशात अव्वल स्थान मिळविले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा या आपल्या भाषणातून अवनखेडचा उल्लेख करून या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

गावाने काय केले?

· घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत प्रकल्प निर्मिती

· बंदीस्त गटारांचा निर्मिती

· सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्डे

· परसबागांची निर्मिती

· मोठया प्रमाणात वृक्षलागवड

· प्रत्येक घरी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी शौचालये

· नदीकाठालगत कचरा टाकू नये याकरीता जॉगिंग ट्रॅक निर्मिती

· जनावरांच्या मलमूत्राचेही व्यवस्थापन

· विद्यार्थ्यांची नखे व केस कापण्याबाबत पाठपुरावा

· जलजन्य आजार पसरू नयेत याकरीता टीसीएलचा वापर

· शाळेत बसविले सॅनिटरी नॅपकीन व डिस्पोजल मशिन

· वैयक्तिक स्वच्छता आणि घर स्वच्छतेलाही प्राधान्य

· गावात १०० टक्के आधारकार्डधारक

· गावकरी देतात श्रमदानाला महत्व

· स्मशानभूमी परिसरात हिरवाई

· सौर उर्जेवर चालतात सार्वजनिक दिवे

- Advertisment -

ताज्या बातम्या