Friday, April 26, 2024
Homeनगरसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – ज्ञानोबा… माउली… तुकाराम असा जयघोष करीत देवाच्या आळंदीमध्ये अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी वरुणराजानेही हलकासा शिडकावा करत माउलींच्या चरणी आपली सेवा रुजू केली.

- Advertisement -

करोनाचं संकट असल्याने यावर्षीची पायी वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे आज प्रस्थान झाल्यांनतर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून आजोळ घराच्या देऊळ वाड्यात विसावल्या आहेत. 30 जूनला शासनाने दिलेल्या पर्यायांपैकी एकाचा अवलंब करून, पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यात येणार आहेत.

आळंदीमध्ये दरवर्षी वैष्णवांचा मेळा भरला जातो. मात्र, करोना महामारीमुळे या वर्षीची आषाढी वारी सोहळा रद्द करण्यात आला असून, अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांनी प्रस्थान ठेवले आहे. यावेळी इंद्रायणी काठी अत्यंत शांततामय वातावरण पहायला मिळाले. दरवर्षी आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल होतात. मात्र, यावर्षी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालायकडून अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत न येण्याचे आवाहन केले होते.

वारकरी संप्रदायाने त्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातूनच थेट प्रक्षेपणाद्वारे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पाहिला डोळ्यात साठवला.

दरम्यान परंपरेप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यातील धार्मिक विधी पहाटे घंटानादात सुरू झाले. विधिवत पूजेनंतर माउलींच्या पादुका मंत्रोच्चाराच्या घोषात फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजित करण्यात आल्या. आळंदीच्या ग्रामस्थांनी माउलींची पालखी खांद्यावर घेत मुख्य वीणा मंडपातून मंदिर प्रदक्षिणा केली. मंदिरात असलेल्या वारकर्यांनी वीणा-टाळ-मृदंगाचा गजर चालू केला. यांनतर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून आजोळ घराच्या देऊळ वाड्यात विसावल्या. आळंदीमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आलेली असून, मंदिर परिसरात निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

मात्र मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितही मंदिर परिसर हा टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानबा माऊली तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आजोळ घरातील देऊळ वाड्यात विसवणार आहेत. त्यानंतर 30 जून ला हेलिकॉप्टर किंवा बसमधून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परंपरेप्रमाणे शनिवार, 13 जून 2020 रोजी प्रस्थान ठेवले असले तरी सरकारकडून अटी घालण्यात आल्या आहेत. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आळंदी मंदिर परिसर कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे येथे कडक पोलिस बंदोबस्त आहे.

घरी बसूनच घ्या वारीचा आनंद- ढगे
पादुकांचे पूजन झाल्यानंतर पालखीने मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली . त्यानंतर ती आजोळघरी नेण्यात आली . पालखी याच ठिकाणी 30 जूनपर्यंत राहणार आहे. भाविकांना घरी बसूनच वारीचा आनंद अनुभवता यावा, यासाठी संस्थान कमिटीतर्फे फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन चर्चासत्र, माहितीपट आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,फ अशी माहिती अध्यक्ष अ‍ॅड. विकास ढगे-पाटील यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या