Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर नगरपरिषदेच्या जागेवर साकारले 'संत भवन'

सिन्नर नगरपरिषदेच्या जागेवर साकारले ‘संत भवन’

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje ) यांच्या संकल्पनेतून विजय नगर मधील नगरपरिषदेच्या ( Sinnar Town Council )36 गुंठ्याच्या खुल्या भूखंडावर सुमारे दीड कोटींहून अधिक खर्चातून विठ्ठल मंदिरासह संत भवन ( SantBhavan ) उभे राहिले असून डोळ्यांसह मनालाही मोहून टाकणार्‍या या परिसराने सिन्नर शहराच्या वैभवात मोलाची भर घातली आहे.

- Advertisement -

सिन्नर तालुक्यातील वारकरी संप्रदायाला समृद्ध वारसा लाभला असून तालुक्याच्या जवळपास प्रत्येक गावातून हजारो वारकरी दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. त्रंबकेश्वरला संत निवृत्तीनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी ते दरवर्षी न चुकता हजेरी लावत असतात. दिंडी सोहळ्यात सहभागी होणार्‍या सर्व वारकर्‍यांना त्यांच्या सोबत असणार्‍या संतांना काही काळ विश्रांती घेता यावी, शांतपणे विठ्ठलाचे आराधना करता यावी यासाठी सिन्नर शहरात कुठलीही व्यवस्था नव्हती, याची खंत राजाभाऊ वाजे यांच्या मनाला सतावत होती.

आपल्या मनातली व्यथा नगरपरिषदेतील आपल्या सहकार्यांसमवेत त्यांनी मांडली आणि राज्यात कुठेही नसेल असे प्रशस्त वारकरी भवन उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नगराध्यक्ष किरण डगळे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवकांनी नगरपरिषदेचा 36 गुंठ्याचा खुला भूखंड त्यासाठी उपलब्ध करून दिला. त्याशिवाय करोडभर रुपयांचा निधीची तरतूद केली. राजाभाऊंनी विधानपरिषदेतील आपल्या सहकार्‍यांच्या निधीची त्यात भर घातली आणि लोकवर्गणीसह जवळपास दीड कोटीहून अधिक रकमेतून सिन्नर शहराच्या वैभवात भर घालेल अशी भव्य दिव्य वास्तू उभी राहिली आहे.

जवळपास 40 बाय 80 फुटाचे महाराष्ट्रात कुठेही नसेल असे वारकरी भवन यापूर्वीच वारकर्‍यांच्या सेवेत दाखल झाले आहे. त्यातील अहिल्याबाई होळकर यांचा अर्धाकृती पुतळा सर्वांनाच आकर्षित करणारा ठरला आहे. या वारकरी भवनाशेजारी संतांना राहण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकर्‍यांना नेहमीच पांडुरंगाच्या भेटीची आस असते. त्यामुळे वारकरी भवनाच्या आवारात भव्य असे विठ्ठल मंदिर उभे राहिले असून विठ्ठलाच्या भक्तीत वारकर्‍यांना तल्लीन होता यावे यासाठी संपूर्ण मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवून वृक्षांच्या छायेत शांतपणे विठ्ठलाचे नामस्मरण करत बसता यावे अशी व्यवस्था करण्यात आली आहे. डोळ्यांसह मनालाही सुखावणार्‍या या परिसरात येणारा प्रत्येकच माणूस विठूनामाचा जयघोष करीत तल्लीन होऊन जाईल असाच माहोल उभा करण्यात नगर परिषद यशस्वी झाली आहे.

वारकर्‍यांसाठी सोयी-सुविधा

वारकरी भवनासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे व राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील काँग्रेस सदस्य रामहरी रुपनवर यांनी प्रत्येकी दहा लाखांचा निधी दिला आहे. त्यातून संपूर्ण परिसराला संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून कडेला लावलेल्या वृक्षांच्या सावलीत निवांत फिरता येईल असा जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे.

परिसरात येणार्‍या वारकर्‍यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह येथे उभारण्यात आले आहे. दोन मजली संत भवनात संतांसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त दोन खोल्या बांधण्यात आल्या असून वरच्या मजल्यावर धार्मिक अभ्यास करू इच्छिणार्‍या वारकर्‍यांसाठी खास धार्मिक अभ्यासिका ही लवकरच उभे राहणार आहे. नगर परिषदेने या संपूर्ण परिसराचे उभारणीसह सुशोभीकरणासाठी एक कोटी एक लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

तीन दिवस कार्यक्रम

विठ्ठल मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार (दि.30) पासून तीन दिवस चालणार आहे. विविध पूजाअर्चा सोबत दोन दिवस सायंकाळी 6 वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. पहिल्या दिवशी महेश्वर महाराज भगुरे गुरुजी (आळंदी) व रोहिदास महाराज जगदाळे (दहिवडी) यांचे भजन व मंगळवारी (दि. 31) डुबेरेसह स्थानिक भजनी मंडळाचे भजन होईल.

बुधवारी (दि.1) देवानंद गिरी महाराज (सांगवी) यांच्या हस्ते कलशारोहण होईल. सकाळी 10 वा. रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतर महाराजांचे कीर्तन होईल. कीर्तनानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिरात 101 किलो मिश्र धातूची विठ्ठल मूर्ती

सुमारे 30 लाख रूपये खर्चातून 32 फूट बाय 29 फूट असे भव्य विठ्ठल मंदिर साकारण्यात आले असून सात फुटी पायावर 39 फूट उंचीची द्रविडीयन वास्तुशैलीशी ते मिळते-जुळते आहे. त्यात जवळपास 10 बाय 10 फुटी गाभारा असून 39 इंच उंच असणारी सुमारे पाच लाखांची मिश्र धातूची 101 किलो वजनाची विठ्ठलाच्या मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. या मंदिरासाठी सिन्नर तालुक्यातील उदार देणगीदारांनी 30 लाखांहून अधिक देणग्यांचा वर्षाव केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या