Thursday, April 25, 2024
Homeनगरसंजीवनी यंदाही घेणार सामुदायिक विवाह सोहळा

संजीवनी यंदाही घेणार सामुदायिक विवाह सोहळा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक सहकार रत्न, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या समाजोपयोगी कामाच्या शिकवणीचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा आयोजित करण्याची परंपरा सुरू केली होती. मात्र करोनाच्या नियमांमुळे गेले दोन वर्षे त्यात खंड पडला होता.

- Advertisement -

परंतु अलीकडेच शासनाने सर्व निर्बंध शिथिल केल्याने संजीवनी युवा प्रतिष्ठान तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्यावतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सामुदायीक विवाह सोहळा चालू वर्षी आयोजित केला जाणार असून इच्छुक वधू-वर आप्तेष्ट यांनी प्रत्यक्ष भेटून अथवा भ्रमणध्वनीद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले आहे.

ते म्हणाले, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे तसेच संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोपरगाव मतदार संघाबरोबर परिसरातील गरजवंत व अडचणीतील नागरिकांना सामाजिक जाणिवेच्या भावनेतून सतत जनहिताची कामे करत आहोत. पूरग्रस्तांना मदत, वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया, सर्व रोग तपासणी शिबिर, दहीहंडी उत्सव, गडकिल्ले स्वच्छता मोहीम, कोविड सेंटर, करोना रुग्णांना मोफत उपचारासह भोजन व तत्सम व्यवस्था, आदिवासी, दीन दलित मागासवर्गीय, अल्पसंख्याक, बहुजनांच्या प्रत्येक संकटात मदत, दुष्काळात तसेच टंचाई काळात शहरवासीयांना व मतदार संघातील शेतकर्‍यांकडे असलेले पशुधन जगविण्यासाठी टँकरद्वारे मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन सहकार्य, विविध क्रीडा स्पर्धांसाठी सहकार्य, तालुका जिल्हा व राज्यस्तरावरील व्यक्तिगत क्रीडा प्रकारांत खेळाडूंना सहकार्य तसेच स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व सर्व प्रकारचे सहकार्य, गारपीटग्रस्तांसाठी मदतीचे पाऊल, खरीप व रब्बी तसेच महापूर आपत्तीत नुकसान झालेल्या पिकांना सर्वाधिक पीक विमा मिळवून देणे, एक राखी जवानांसाठी, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत बंधारे, दगडी साठवण तलाव, शेततळी बांधून त्यातून शेतकर्‍यांना मदत, विविध नैसर्गिक आपत्तीत व्यवस्थापनासह तात्काळ मदत करून 2018 व 2019 मध्ये सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा थाटात साजरा करत शेकडो कुटुंबांच्या आनंदाचा व निराधारांना सतत पाठबळ देण्यात संजीवनी युवा प्रतिष्ठानने आजवर मोलाची भूमिका पार पाडलेली आहे.

आता करोना प्रभाव कमी झाल्यामुळे पुन्हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. गरीब-श्रीमंत अथवा जाती धर्माची आडकाठी न ठेवता सर्वांसाठी माणुसकीचे केंद्र असणार्‍या या विवाह सोहळ्यात इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व त्याबाबतची नावं नोंदणी करावी, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या