Wednesday, April 24, 2024
Homeनगरसंगमनेर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू

संगमनेर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यातील व शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी सातत्याने विविध उपाययोजना केल्या जात आहेव. शहरातील रुग्णांकरिता कॉटेज हॉस्पिटल या ठिकाणी नव्याने कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून याची पाहणी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.

- Advertisement -

संगमनेर नगरपालिकेच्या वतीने कॉटेज हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर पाहणीच्या वेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्षा सुमित्राताई दिड्डी, आरोग्य सभापती नितीन अभंग, विश्वासराव मुर्तडक, किशोर पवार, किशोर टोकसे, योगेश जाजू, कुंदन लहामगे, बाळासाहेब पवार, मनीषा भळगट, राजेंद्र गुंजाळ, मिलिंद औटी, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तहसीलदार अमोल निकम, श्रीनिवास पगडाल, डॉ. किशोर पोखरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचोरिया आदी उपस्थित होते.

संगमनेर शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपाययोजना केल्या असून नगरपालिकेने सातत्याने सार्वजनिक ठिकाणांसह प्रत्येक वॉर्डामध्ये दररोज फवारणी केली आहे. याच बरोबर मौलाना आझाद मंगल कार्यालयामध्ये अद्ययावत कोविड सेंटर उभारले आहे. शहरात नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या गोळ्यांचे वाटप केले आहे.

त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये जनजागृती करून मास्क व सॅनिटायझर चे वाटपही केले आहे. याचबरोबर अनेक गरजूंना औषधोपचाराचे ही वाटप करण्यात आले आहे. रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांना जेवणाचे डबे पुरविणे असे सातत्याने उपक्रम राबवले आहेत. लॉकडाऊन काळापासून सर्व कर्मचारी रात्रंदिवस काम करून नागरिकांसाठी सेवा देत आहे.

याचबरोबर अमृत उद्योग समूहाच्या वतीने करोना रोखण्यासाठी आर्थिक निधीसह अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये करोना विलगीकरण कक्षही सुरू करण्यात आला आहे. तर अतिगंभीर लक्षणे असणार्‍या करोना रुग्णांसाठी एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव या ठिकाणी स्वतंत्र कक्ष ही सुरू करण्यात आला आहे.

याप्रसंगी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, करोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्यावर अजून प्रभावी औषध मिळाले नसून जगभर संशोधक या लशीवर संशोधन करत आहेत. त्यात लवकरच यश मिळेल, अशी आशा आहे. मात्र नागरिकांनी तोपर्यंत शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.

प्रत्येकाने सोशल डिस्टन्सचे पालन करावे तसेच सॅनिटायझरचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच गर्दी करू नये जेणेकरून करोना आपल्याला रोखता येईल. करोना हा अदृश्य शत्रू असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सतर्कता बाळगणे हेच संरक्षण ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या, करोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे अत्यंत गरजेचे आहे. घरगुती समारंभ, विवाह, वाढदिवस, जेवणावळी या तातडीने थांबवल्या पाहिजे. प्रत्येकाने नियमांचे पालन केले तर आपल्याला करोना रोखता येईल. करोनाची साखळी पूर्णपणे तोडणे हे आपले पहिले उद्दिष्ट आहे.

त्याचबरोबर बाहेरून आलेल्या पाहुण्यांची माहिती प्रशासनाला देणे, काही लक्षणे आढळल्यास तातडीने दवाखान्यात दाखल करणे या बाबी केल्या पाहिजेत. प्रत्येकासाठी निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. स्वत:ची सुरक्षितता ही कुटुंबाची सुरक्षितता ठरणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी सर्व पदाधिकार्‍यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करून कोविड सेंटरची पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या