Thursday, April 25, 2024
Homeनगरसंगीता शिंदे यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

संगीता शिंदे यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवडणूक जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केली होती. मात्र सभापती संगीता शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केलेली सभापतिपदाच्या निवडणुकीला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. मात्र न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांनी सदरची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे 18 नोव्हेंबर 2021 रोजी होणारी सभापती पदाची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

संगीता सुनील शिंदे यांनी पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी या आशयाची याचिका डॉ.वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे दाखल केली होती. यात जिल्हाधिकार्‍यांनी वंदना मुरकुटे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. या काळात सौ. शिंदे यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आपले सभापतिपद वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने सौ. शिंदे यांची याचिका फेटाळली. त्यामुळे सौ. वंदना मुरकुटे यांच्या सभापतीपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.

सदर निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करावा अशा आशयाची याचिका सौ. संगीता शिंदे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र दोन्ही बाजू पडताळून पहात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांनी सदरची याचिका फेटाळून लावली.

सभापती पद हे ओबीसी महिलेकरिता आरक्षीत असल्यामुळे डॉ. वंदना मुरकुटे या एकमेव ओबीसी महिला सदस्य असल्यामुळे जवळपास त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. केवळ सोपस्कार म्हणून सदरची निवडणूक गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या