Thursday, April 25, 2024
Homeनगरसंगमनेरच्या कारागृहातील 36 कैद्यांची अखेर अन्य कारागृहात रवानगी होणार

संगमनेरच्या कारागृहातील 36 कैद्यांची अखेर अन्य कारागृहात रवानगी होणार

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेरच्या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी डांबल्याने या कैद्यांना होणारा त्रास व या कैद्यांकडून अधिकार्‍यांना होणारा त्रास याबाबतचे वृत्त ‘दैनिक सार्वमत’ ने प्रसिद्ध करताच संगमनेर कारागृहाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. या कारागृहातील एकूण 65 कैद्यांपैकी 21 जणांची येरवडा तर 15 जणांची नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात येणार असून याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

- Advertisement -

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच काही वर्षांपूर्वी नवीन कारागृह बांधण्यात आले आहे. या कारागृहात पुरुष कैद्यांसाठी तीन तर महिला कैद्यांसाठी एक अशा चार बराकी आहेत. या कारागृहाची क्षमता 24 कैदी ठेवण्याची आहे. मात्र अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक कैदी या कारागृहात ठेवलेले असतात. सध्या या कारागृहामध्ये विविध गुन्ह्यांमधील एकूण 65 कैदी शिक्षा भोगत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी भरल्याने अनेक समस्या तयार झाल्या आहेत. या कारागृहामध्ये गेल्या काही दिवसांपासून रॅगिंगचा प्रकार सुरू झाला आहे.

जुने कैदी नवीन कैद्यांना वेगवेगळी कामे सांगतात. शौचालय साफ करण्यापासून इतर अनेक कामे नवीन कैद्यांना करावी लागतात. ही कामे न केल्यास जुने कैदी नवीन कैद्यांना मारहाण करतात. संगमनेरच्या कारागृहात असे प्रकार घडत असताना पोलीस व कारागृह अधिकार्‍यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. काही महिन्यांपूर्वी एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. याशिवाय बंदोबस्तावर असलेल्या कर्मचार्‍यांना कैदी त्रास देत असतात. एका कैद्याने महिला पोलीस अधिकार्‍याला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. मात्र याप्रकरणी संबंधित कैद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.

कारागृहात बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे कारागृहातील कैद्यांना गुटखा, तंबाखूच्या पुढ्या सहज उपलब्ध होतात. पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडीतील आरोपी या कारागृहात ठेवलेले असतात. न्यायालयीन कोठडीतील कैद्यांना त्रास देण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे संगमनेरच्या तुरुंगाचे वातावरण खराब झालेले आहे. तुरुंग अधिकारी क्वचितच या कारागृहाला भेट देतात. त्यांचे नियंत्रण या कारागृहावर राहिले नसल्याचे दिसत आहे.

पूर्वी फक्त शुक्रवारी आरोपींच्या नातेवाईकांना कारागृहात येण्याची परवानगी होती. आता कोणत्याही दिवशी आरोपीचे नातेवाईक कारागृहातील कैद्याला सहज भेटू शकतात. कारागृह अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळेच संगमनेरच्या कारागृहात गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत दैनिक सार्वमतमधून वारंवार आवाज उठवल्याने अखेर या कैद्यांची रवानगी अन्य कारागृहात करण्यात येणार आहे.

संगमनेर येथील कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यातील बहुतांशी कैद्यांची रवानगी बाहेरील कारागृहात करण्यात येणार आहे. या कैद्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. ही चाचणी शासकीय रुग्णालयांमधून केली जाणार आहे. भविष्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो, यामुळे वेळीच या कैद्यांची रवानगी केली जाणार आहे. जास्त दिवसाची शिक्षा असणार्‍या कैद्यांची प्रामुख्याने बाहेरील कारागृहात रवानगी केली जाणार आहे.

– पिराजी भडकवाड तुरुंग अधिकारी ,संगमनेर कारागृह.

- Advertisment -

ताज्या बातम्या