Thursday, April 25, 2024
Homeनगरत्रासदायक वेड्या बाभळी अखेर संगमनेर नगरपालिकेने जेसीबीने तोडल्या

त्रासदायक वेड्या बाभळी अखेर संगमनेर नगरपालिकेने जेसीबीने तोडल्या

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील पंचायत समितीच्या जुन्या कार्यालया मागील मोकळ्या जागेत वेड्या बाभळीमुळे तयार झालेले काटवन अखेर संगमनेर नगरपालिका प्रशासनाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले.

- Advertisement -

संगमनेर नगरपालिका हद्दीतील जुन्या पंचायत समितीच्या मागील बाजूला असणार्‍या आणि गुंजाळ नगर दक्षिण परिसरात मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर वेड्या बाभळी वाढल्या होत्या. या वेड्या बाभळी खाजगी मालकाच्या जागेत वाढलेल्या होत्या. या परिसरात मोठे काटवन तयार झाल्याने परिसरातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या परिसरात गेल्या काही महिन्यापासून बिबटे व चोरटे यांच्यामुळे मोठी दहशत निर्माण झालेली आहे. वेड्या बाभळीमुळे बिबट्यांना मुक्त संचार करणे सोपे झाले होते. यामुळे या जागेतील वेड्या बाभळी तोडाव्या अशी मागणी परिसरातील नागरिकांनी संबंधित जागा मालकाकडे अनेकदा केली होती. मात्र जागा मालकाने या बाभळींकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अभिजीत घाडगे यांनी या प्रश्नात लक्ष घातले. संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना याबाबत निवेदन देऊन बाभळीची झाडे तोडण्याची मागणी केली. सात दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

मुख्याधिकार्‍यांनी या निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागाला त्वरीत काटवन तोडण्याचे आदेश दिले. यानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने या परिसरातील वेड्या बाभळी तोडून टाकण्यात आल्या. काटवण उध्वस्त करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या