Friday, April 26, 2024
Homeनगरराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संगमनेरात पुरस्कार वितरण

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संगमनेरात पुरस्कार वितरण

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राजस्थानचे मुख्यमंत्री नामदार अशोक गहलोत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार छगनराव भुजबळ, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12.30 वा. शेतकी संघ प्रांगण, यशोधन कार्यालयाशेजारी जयंती महोत्सव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार डॉ. सुधीर तांबे व बाजीराव पा. खेमनर यांनी दिली आहे.

- Advertisement -

जयंती महोत्सव पुरस्कार कार्यक्रमाबाबत माहिती देताना आ. डॉ. तांबे म्हणाले की, यावर्षीचा जयंती महोत्सव हा करोना काळामुळे पुढे ढकलण्यात आला होता. हे पुरस्कार वितरण शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12.30 वा. शेतकी संघ प्रांगणात राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री नामदार अशोक गहलोत यांच्या हस्ते व माजी मंत्री आमदार छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दलचा यावर्षीचा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृति पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. अ. ह. साळुंखे यांना तर कृषी, शिक्षण, समाजसेवा आणि पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार पर्यावरण तज्ञ व वनराईचे विश्वस्त डॉ. सुधीर भोंगळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

याचबरोबर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील नेतृत्व पुरस्कार राज्याचे माजी मंत्री व मांजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांना प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन या पुरस्कारार्थींचा सन्मान होणार आहे.जयंती महोत्सवानिमित्त शनिवार 24 सप्टेंबर दुपारी 12.30 वा. माजीमंत्री आमदार यशोमती ताई ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला कार्यकर्ता मेळावा व कीर्तन जुगलबंदी होणार आहे.

तसेच सायं. 7 वा युवा जल्लोष धमाका हा कार्यक्रम होणार आहे. तर रविवारी दुपारी 12.30 वा. घे भरारी स्पर्धा परीक्षा तयारी संवाद होणार आहे आणि सायंकाळी 7 वा. महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रम हास्य जत्रा होणार आहे. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.

या पुरस्कार निवड समितीत विजय अण्णा बोर्‍हाडे, उल्हासराव लाटकर, डॉ. राजीव शिंदे, उत्कर्षाताई रुपवते, प्राचार्य केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात हे सदस्य आहेत.तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, महिला व युवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सव समिती आणि अमृत उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या