Thursday, April 25, 2024
Homeनगरसंगमनेर : करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या लॉन्सला २० हजाराचा दंड

संगमनेर : करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या लॉन्सला २० हजाराचा दंड

संगमनेर l प्रतिनिधी

करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणीचे आदेश जारी केले. या आदेशान्वये मोठी गर्दी

- Advertisement -

होणार्‍या लग्न समारंभ व अंत्यविधीसारख्या कार्यक्रमांसाठी उपस्थितीवर मर्यादा आल्या असून उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे आदेशही बजावण्यात आले आहेत. करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या घुलेवाडी येथील अमृता लॉन्स चालकाला प्रशासनाने २० हजार रुपयांचा दंड केला आहे. नियमांचा भंग केल्याने एखाद्या मंगल कार्यालयावर अशी कारवाई होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.

१८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व करोना केअर सेंटर, जिल्हा करोना रुग्णालय व डेडिकेटेड करोना हेल्थ सेंटरच्या इमारती व तेथील सामग्री सज्ज ठेवण्याचे आदेश बजावले आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकार्‍यांच्या जबाबदार्‍याही निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुका हद्दीतील विवाह सोहळे व अंत्यविधी अशा मोठी गर्दी होणार्‍या कार्यक्रमांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

या दोन्ही कार्यक्रमांना पन्नास पेक्षा कमी उपस्थितीचे नियम लागू झाले असून लग्न सोहळ्यात निश्‍चित संख्येपेक्षा जास्त उपस्थिती नसावी याची जबाबदारी संबंधित लॉन्स वा मंगल कार्यालय चालकांवर सोपविण्यात आली आहे. यासोबतच या अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणार्‍या प्रत्येकाने मुखपट्टीचा वापर व सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचेही बंधन घालण्यात आले आहे. यावर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकार्‍यांना आदेशित करण्यात आले आहे.

त्यानुसार काल संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी काही ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबविली. यावेळी घुलेवाडीतील अमृता लॉन्समध्ये सुरु असलेल्या एका विवाह सोहळ्यात करोना नियमांची सर्रास पायमल्ली झाल्याचे निरीक्षण या अधिकार्‍यांनी नोंदविले. तेथे नियमापेक्षा अधिक नागरिकांच्या उपस्थितीसह मुखपट्टी शिवाय वावरणार्‍यांची मोठी संख्या आणि सामाजिक अंतराची एैशीतैशी दिसून आल्याने अमृता लॉन्सच्या चालकावर २० हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने तालुक्यातील मंगल कार्यालय चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या