Friday, April 26, 2024
Homeनगरचंदन चोरी करणारी सहा जणांची टोळी जेरबंद

चंदन चोरी करणारी सहा जणांची टोळी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोपरगाव तालुक्यासह नगर शहरातून चंदन चोरी करणार्‍या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी

- Advertisement -

घोडेगाव (ता. नेवासा) येथील शनिशिंगणापूर चौकात सापळा लावून अटक केली. शितल ऊर्फ सिताराम उर्फ गणेश भानुदास कुर्‍हाडे (वय 32), करण विजय कुर्‍हाडे (वय 25 दोघे रा. चितळे स्टेशन ता. राहाता), परमेश वैश्या भोसले (वय 26 रा. भेंडाळा ता. गंगापूर जि. औरंगाबाद), सतीश मच्छिंद्र शिंदे (वय 32), संतोष मारूती शिंदे (वय 32 दोघे रा. चोभे कॉलनी, बोल्हेगाव, नगर), गणेश विष्णू गायकवाड (वय 26 रा. गंगापूर जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

सदरचे चंदन बाळासाहेब हरिभाऊ गायकवाड (रा. चांदा ता. नेवासा) याला विक्री करण्यासाठी नेले जात होते. पोलिसांनी गायकवाड याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. पोलिसांनी 16 किलो चंदन, एक चारचाकी वाहन असा तीन लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मागील सहा महिन्यांपासून आरोपी जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चंदनाची चोरी करत होते. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील कोल्हे वस्ती, धारणगाव, वारी तसेच नगरमधील एस्सार पेट्रोपंपावर चंदन चोरी केली होती. याप्रकरणी कोपरगाव तालुक्यात तीन व तोफखाना पोलीस ठाण्यात एक असे गुन्हे दाखल झाले आहेत.

चंदन तस्करांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सूचना केल्या होत्या. निरीक्षक कटके यांनी चंदन तस्करांना अटक करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी दत्ता हिंगडे, सुनील चव्हाण, बबन मखरे, संदीप पवार, सुरेश माळी, जालिंदर माने, सागर ससाणे, चंदू कुसळकर यांचे पथक नियुक्त केले होते.

काही इसम चारचाकी वाहनातून चंदनाची झाडे घेऊन नेवासा- श्रीरामपूर रोडने चांदा (ता. नेवासा) येथे विक्रीसाठी जात असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. निरीक्षक कटके यांनी आपल्या पथकाला सूचना करून घोडेगाव येथे सापळा लावण्यास सांगितला. मिळालेल्या माहितीनुसारचे वाहन येताच पोलिसांनी त्याला अडविले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्यात 16 किलो चंदन मिळून आले.

पोलिसांनी वाहनातील सहा जणांना अटक करत चंदन व वाहन ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शिर्डी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, नगर शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या