Wednesday, April 24, 2024
Homeनगरवाळू वाहतूक करणार्‍या पिकअपच्या धडकेत युवकाचा मृत्यु

वाळू वाहतूक करणार्‍या पिकअपच्या धडकेत युवकाचा मृत्यु

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

वाळू वाहतूक करणार्‍या पिकअपने धडक दिल्याने युवकाचा मृत्यु झाल्याची घटना काल मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास शहरातील जोर्वेनाका परिसरात घडली. वाळू तस्कराच्या वाहनाच्या अपघातात महिन्याभरात चौथा बळी गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

संगमनेर शहरालगत असणार्‍या प्रवरा नदीपात्रातून रात्री मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूचा उपसा सुरु आहे. वेगवेगळ्या वाहनातून वाळूची वाहतूक केली जात आहे. रात्री 2 वाजेच्या सुमारास महिंद्रा पिकअप क्रमांक एम. एच. 15 ए. जी. 2440 या वाहनातून वाळू वाहतुक केली जात होती.

जोर्वे नाका परिसरात या वाहनाने रस्त्यावरुन जाणार्‍या अरफाद अल्ताफ शेख (वय 20) या युवकाला धडक दिली. या अपघातात अरफाद गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती समजताच रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक अभय परमार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला दवाखान्यात हलविले. मात्र उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यु झाला.

पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. हेड कॉन्स्टेबल खाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 66/2020 नुसार नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

संगमनेर तालुक्यातील देवगड फाटा येथील निळवंडे कॅनॉलच्या 30 फुट खोल खड्ड्यात वाळूचे वाहन पडून तीन जणांचा मृत्यु झाल्याची घटना 20 जून रोजी घडली होती. वाळू तस्करांच्या वाहनामुळे बळी जाण्याची ही घटना ताजी असतांनाच काल आणखी एका युवकाचा बळी गेला. महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अवैध वाळू उपसा सुरु असून सामान्यांचे बळी जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होेत आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात विविध वाहनांद्वारे वाळूची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. नंबर प्लेट नसलेले वाहन चुकीचा नंबर टाकलेला वाहन सर्रास वापरले जात आहे. कालबाह्य ठरलेल्या वाहनांमधून वाळू वाहतूक होत असल्याचे पुढे आले आहेे. पोलिसांनी व महसूल विभागाने अशा सर्व वाहनांचा शोध घेवून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या