Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअभयारण्याचे दार उघडणार

अभयारण्याचे दार उघडणार

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोना संकटामुळे सात महिन्यांपासून बंद असलेल्या नाशिक वनवृत्तातील अभयारण्यांचे दरवाजे पर्यटनासाठी खुले करण्याचे संकेत वन्यजीव विभागाने दिले आहेत.

- Advertisement -

राज्यातील काही अभयारण्यांत पर्यटनाला परवानगी दिल्यापासून नाशिकच्या वन पर्यटनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेऊन पर्यटनासंदर्भातील नियमावली जाहीर होणार असल्याची माहिती नाशिक वन्यजीव विभागाने दिली आहे.

लॉकडाऊन झाल्यापासून वन पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. अनलॉकच्या टप्प्यांमध्ये करोनाची स्थिती विचारात घेऊन राज्यातील काही ठिकाणी पर्यटनाला मुभा देण्यात आली आहे.

वन्यजीव विभागाने अधिकृतरीत्या अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार नाशिक वनवृत्तातील नाशिक, अहमदनगर, धुळे व जळगावमधील वन पर्यटनावरील बंदी उठण्याची शक्यता आहे.

यात नांदूरमध्यमेश्वर, कळसूबाई-हरिशचंद्रगड, अनेर डॅम आणि यावल अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. याबाबत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वन्यजीव विभागाची बैठक घेतली जाणार आहे.

त्यामुळे पर्यटनासंदर्भात प्रामुख्याने विचार केला जाईल. नांदूरमध्यमेश्वरमध्ये पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात साडेतीन हजार पक्ष्यांचे आगमन नांदूरमध्यमेश्वरमध्ये झाल्याचे निरीक्षण वनाधिकार्‍यांनी नोंदवले आहे. त्यामुळे पर्यटकांसह अभ्यासकांचे लक्ष अभयारण्ये खुली होण्याकडे लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या