Wednesday, April 24, 2024
Homeनगर'समृध्दी' महामार्ग : नावातच सगळं काही!

‘समृध्दी’ महामार्ग : नावातच सगळं काही!

‘‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत. तर, अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथे चांगले रस्ते आहेत.’’ अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे हे वाक्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात नेहमी सांगतात. ज्या प्रदेशातील रस्त्यांचे जाळे भक्कम आहे, तेथील विकास झपाट्याने झाल्याचे पाहायला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून दूर राहिलेल्या भागाला समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी मुंबई ते नागपूर असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारण्यात येत आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथून करण्यात येत आहे.

राज्याच्या या योगदानात अर्थातच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या मोजक्या शहरांचा हातभार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील काही भाग विकासापासून मागे पडले आहेत. मागासलेल्या भागांच्या विकासासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे. ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक ८३११ हेक्टर जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया अवद्या आठ महिन्यात पार पडली.

- Advertisement -

समृध्दी महामार्गाचा डिझाइन स्पीड १५० कि.मी. / प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून १०० कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर नागपूरहून मुंबईपर्यंत यायला अवघे सहा ते आठ तास लागतील. त्यामुळे साहजिकच औद्योगिक तसेच कृषी मालाची वाहतूक विनाअडथळा आणि वेगवान पद्धतीने होऊ शकणार आहे.

२४ जिल्ह्यांना लाभ

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अविकसित राहिलेले हे दोन भूप्रदेश महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

पर्यटनवाढीलाही चालना

समृद्धी महामार्ग आणि त्यासाठी २४ ठिकाणी बांधण्यात येणार असलेले जोडरस्ते यांमुळे राज्यातील अनेक पर्यटन स्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. लोणारचे सरोवर, वेरुळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबी का मकबरा इत्यादी पर्यटन स्थळे नजीक येणार आहेत.

कृषी समृद्धी केंद्रे आणि रोजगार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ३९२ गावांना जोडणार आहे. पूर्णपणे ग्रीनफिल्ड असलेला समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणी राज्य वा राष्ट्रीय महामार्गाला छेदून जाईल, त्या ठिकाणी इंटरचेंजेस तयार केले जाणार आहेत. असे एकूण २४ इंटरचेंजेस समृद्धी महामार्गावर असतील. या २४ पैकी १८ इंटरचेंजेस नजीक कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केली जाणार आहे. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर विकसित केले जाणारे प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र स्वयंपूर्ण नवनगर असेल. नियोजनबद्ध विकास हे या नवनगरांचे वैशिष्ट्य असेल. या नवनगरांमध्ये शेतीला पूरक उद्योग असतील, तसेच औद्योगिक उत्पादनासाठी काही भूखंड राखीव असतील. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, मोकळे रस्ते, निवासी इमारती, इत्यादी सुविधा या नवनगरांमध्ये असतील एका कृषी समृद्धी केंद्रात ३० हजार थेट तर ६० हजार अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये-

• लांबी ७०१ किमी

• एकूण जमीन : ८३११ हेक्टर

• रुंदी : १२० मीटर

• इंटरवेज : २४

• अंडरपासेस : ७००

• उड्डाणपूल : ६५

• लहान पूल : २९४

• वे साईड अमॅनेटीझ : ३२

• रेल्वे ओव्हरब्रीज : ८

• द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड)

• द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष

• कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२

• प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये

• एकूण लाभार्थी : २३ हजार ५००

• वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये

• कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६

• द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत

• ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

शेतमाल साठवणुकीला चालना

समृद्धी महामार्गालगत विकसित करण्यात येणार असलेल्या १८ नवनगरांपैकी ८ नवनगरांच्या उभारणीला एमएसआरडीसीने प्राधान्य दिले आहे. औरंगाबाद, बुलडाणा आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत उभारण्यात येणार असलेल्या तीन नवनगरांमध्ये ७५ एकर परिसरात गोदामे उभारण्याचा प्रस्ताव वखार महामंडळाने एमएसआरडीसीला सादर केला होता. त्यासंदर्भात नुकताच उभय महामंडळांमध्ये करार झाला. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील जांबरगाव, बुलडाणा जिल्ह्यातील सावरगाव माळ आणि वर्धा जिल्ह्यातील रेणकापूर येथे गोदामे उभारली जाणार असून त्यात शेतमाल साठवणुकीला चालना देण्यात येणार आहे.

वन्यजीव आणि पर्यावरणाचे रक्षण

महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर तब्बल साडेबारा लाख झाडांची लागवड केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे प्रतिकिलोमीटर किमान १३२६ झाडे लावली जाणार आहेत. तसेच ही झाडेही वैशिष्ट्यपूर्ण असतील. त्या त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य, मातीचा पोत लक्षात घेऊन त्या वातावरणात कोणती झाडे तग धरू शकतील, कोणती वाढू शकतील, याचा अभ्यास करूनच झाडांची लागवड केली जाणार आहे. या कामासाठी लखनऊ येथील नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय) या संस्थेची मदत घेतली जात आहे.

वन्यजीवांना त्यांच्या अधिवासात समृद्धी महामार्ग अडथळा ठरू नये यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशा अंडरपास आणि ओव्हरपासची (डब्ल्यूयूपी आणि डब्ल्यूओपी) उभारणी करण्यात आली आहे. वन्यजीवांचा वावर ज्या परिसरात असेल त्या परिसराला अनुरूप अशीच या अंडरपास वा ओव्हरपासची रचना केलेली आहे.

अंडरपासेसची निर्मिती-

समृद्धी महामार्ग ३९२ गावांना जोडणार आहे. याचा अर्थ या ३९२ गावांना विकासाचा परिसस्पर्श होणार आहे. नजीकच्या भविष्यात त्यांचा आर्थिक चेहरामोहरा बदलणार आहे. परंतु असे असताना गावांचा परस्परांशी संपर्क कायम राहावा, ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात अडथळा होऊ नये यासाठी संपूर्ण महामार्गावर अंडरपासेसची निर्मिती केली जाणार आहे.

छोट्या वाहनांसाठी, गुरांसाठी, बैलगाड्यांसाठी, पादचाऱ्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या या अंडरपासेसची एकूण संख्या ७०० च्या आसपास असेल, समृद्धी महामार्गावर दर एक किलोमीटर अंतरावर अशा प्रकारचे अंडरपासेस दिले जाणार आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तसेच या महामार्गाच्या दोन्ही बाजूला तीन मीटर उंचीची भिंतही बांधली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही अनाहूत वाहने, प्राणी या महामार्गावर येऊ शकणार नाहीत व महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त राहील.

येत्या दशकात महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलण्याचे सामर्थ्य असलेला हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धतेचे प्रतीक ठरेल, यात शंका नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या