Thursday, April 25, 2024
Homeनगर‘समग्र शिक्षा अभियाना’च्या 185 कर्मचार्‍यांचा कोंडमारा

‘समग्र शिक्षा अभियाना’च्या 185 कर्मचार्‍यांचा कोंडमारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील विविध बांधकामासह गुणवत्तेचा डोलारा संभाळणार्‍या समग्र शिक्षण विभागातील 185 कर्मचार्‍यांचा 20 वर्षापासून कोंडमारा झाला आहे. दरवर्षी नोकरीत कायम होण्याची स्वप्न पाहणारे हे कर्मचारी आता नोकरीतून सेवानिवृत्त होण्याची वेळ आली आहे. तर सहा वर्षापासून या कर्मचार्‍यांच्या पगारात कवडीची वाढ झालेली नाही. यामुळे वाढत्या महागाईच्या आगडोमामध्ये या कर्मचार्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आता 20 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर इच्छा असून देखील या कर्मचार्‍यांना नोकरीत बदल करत येत नसून सरकार देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या कर्मचार्‍यांचे हाल सुरू आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ज्याप्रमाणे प्राथमिक शिक्षकांना महत्व आहे, तेवढेच महत्व सम्रग शिक्षण विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आहे. या विभागात गेल्या 20 वर्षापासून कंत्राटी पध्दतीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या खांद्यावर शाळा खोल्या बांधकाम, विद्यार्थ्यांचा मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, युडायस (विद्यार्थ्यांच्या संख्येपासून ते शिक्षकांची सर्व माहिती), शाळा खोल्यांची स्थिती, शाळेतील विजेपासून शौचालयाची माहिती, वर्गासंख्येनूसार आणि शिक्षकांच्या संख्येनूसार विविध अहवाल, शासनाचे दैनदिन अहवाल, शिक्षकांचा प्रवास भत्ता, शिक्षकांची विविध विशेष प्रशिक्षणे, मॉडेल स्कूल योजना, अपंग समावेशित शिक्षण, विषय तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक, त्यांचे पगार, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीचा माहिती, शैक्षणिक निर्देशांक संशोधनासह अन्य महत्वाच्या जबाबदार्‍या सोपवण्यात आलेला आहेत.

यातील एकही काम सम्रग शिक्षण विभागाने न केल्यास त्याचा विपरीत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दैनदिन कामावर परिणाम होणार आहे. असे असतांना राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे या विभागात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांची सध्या आर्थिक ओढाताण सुरू आहे. आपल्या आयुष्यातील अमुल्य 20 वर्षे सेवा केल्यानंतर या विभागातील कर्मचारी नोकरीत कायम होण्याच्या प्रतिक्षेत आहे. यामुळे या कर्मचार्‍यांना आता नोकरीत बदलाचा पर्याय खुंटला आहे. मात्र, दुसरीकडे सरकारने सध्या कंत्राटी पध्दतीवर नोकर्‍या देण्याचा सपाटा सुरू केल्याने सम्रग शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांच्या नोकरीत कायम होण्याच्या आशा धूसर होतांना दिसत आहे.

दुसरीकडे दररोज वाढणार्‍या महागाईमुळे या विभागातील कर्मचार्‍यांची आर्थिक होळपळ सुरू असून सहा वर्षापासून पगार वाढीच्या प्रतिक्षेत हे कर्मचारी आहेत. काही महिन्यांपर्वी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी समग्रच्या कर्मचार्‍यांना 10 टक्के पगार वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन आता हवेत विरल्यात जमा आहे. या विभागातील कर्मचार्‍यांच्या व्यथांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद (एमपीएसपी) च्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी मंगळवारी दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

राज्य पातळीवर दबावगटाचा अभाव

राज्यात शिक्षकांपासून जिल्हा परिषदेतील कायम सेवेत असणार्‍या कर्मचार्‍यांपर्यंत अन्य विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांचा दबावगट कार्यरत आहे. मात्र, समग्र शिक्षण विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा दबावगट अथवा राज्य पातळीवर संघटना कार्यक्षम नसल्याने या कर्मचार्‍यांचे प्रश्न सुटलेले नाही. यामुळे आता सम्रगच्या कर्मचार्‍यांनी प्रश्न सोडवण्यासाठी राज्यपातळीवर लढा उभारण्याची वेळ आली आहे.

नगर जिल्ह्यात सम्रग शिक्षण विभागात गेल्या 20 वर्षापासून 150 ते 185 कर्मचारी कंत्राटी पध्दतीने कार्यरत आहेत. यात कार्यकारी अभियंता संगणक प्रोग्रामर, जिल्हा समन्वयक प्रकल्प अभियान, संशोधन सहायक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, एमआयएस कॅडिनेटर, विषय तज्ज्ञ शिक्षक, मोबाईल टिचर, विषय सहायक आदी पदावर कर्मचारी कार्यरत असून त्यांना अनेक वर्षापासून 20 ते 40 हजार एवढा पगार मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या