Tuesday, April 23, 2024
Homeनगरउन्हाळा सुरू होण्याआधीच सलाबतपूरकरांची पाण्यासाठी भटकंती

उन्हाळा सुरू होण्याआधीच सलाबतपूरकरांची पाण्यासाठी भटकंती

सलाबतपूर |वार्ताहर| Salabtpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर गावचा पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून उन्हाळा सुरू होण्याआधीच नागरीकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

- Advertisement -

सलाबतपूरकरांसमोर पाणीप्रश्न, आरोग्य, स्वच्छतेचे प्रश्न कायमच ‘आ’ वासून उभे आहेत. 22 गावांसाठी उभी केलेली गळनिंब जीवन प्राधिकरण योजना सुरू झाल्यापासूनच ‘असून अडचण नसून खोळंबा’ बनली आहे. तिचे पाणी गळती, वीजबिल, कर्मचारी वेतन, मोटार नादुरूस्त अशी अनेक कारणे सतत सुरू असल्याने नागरिकांच्या आता या योजनेचे पाणी मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत.

शासनाचे जनतेला पाण्यासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असल्याचे बोलले जात आहे. शासन दरबारी ही योजना सुरू करण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी गावांना आपला कायमचा स्त्रोत उभा करावा लागणार आहे. यावर्षी भरपूर पाऊस होऊनही सलाबतपूर गावातील बहुतेक विहिरी, कूपनलिका कोरड्या पडण्यास सुरूवात झाली तर अनेकांची पाणीपातळी आधीच खालावली आहे.

त्यामुळे गावचा पाणीप्रश्न अतिशय बिकट बनला असून पाणीप्रश्नाबाबत गावाला नक्की वाली कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पाणीप्रश्न बिकट असल्याने लोक हैराण झाले आहेत. वाडीवस्तीवर राहणारे शेतकरीही पाण्यामुळे चिंतेत आहेत. शेतीला अद्याप पाटपाणी मिळत नसल्याने चिंतेचे ढग त्यातच विहिरी कुपनलिकाचे पाणीपातळी लगेचंच खालावली असल्याने व प्यायलाही पाणी नसल्यामुळे आणखी अवसान गळाले आहे.

सलाबतपूर गाव हे बाजारपेठ असलेले आहे. आतापर्यंत मात्र पाण्यासारखा जिव्हाळयाचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्याच गावाला कुठलाही पाणी स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत नक्की काय होणार? हे देवच जाणे. प्राधिकरण योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील की ग्रामपंचायतला नविन निवडून आलेले पदाधिकारी काही वेगळा मार्ग निवडतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांनी पाण्यासारखा पैसा उधळला तर दुसरीकडं पाण्यासाठी जनता मरत आहे. तर नूतन पदाधिकारी आपली जबाबदारी ओळखून पाणीप्रश्न सोडवतील काय हे पाहणे गरजेचे आहे.

नव्या पदाधिकार्‍यांकडून मोठ्या अपेक्षा

मागील पंचवार्षिक मधील पदाधिकार्‍यांना पाणीप्रश्न सोडवण्यात अपयश आले. मात्र या निवडणुकीत नूतन पदाधिकारी पाणीप्रश्न सोडवण्याचे मतदाराना दिलेले आश्वासन पूर्ण करणार की ‘ये रे माझ्या मागल्या’ची भूमिका घेणार आता याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या