Friday, April 26, 2024
Homeनगरसलाबतपूर ग्रामपंचायतीत गठ्ठा मतदानाचा कल ठरणार निर्णायक

सलाबतपूर ग्रामपंचायतीत गठ्ठा मतदानाचा कल ठरणार निर्णायक

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील ग्रामपंचायतीच्या 11 जागांपैकी 10 जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी

- Advertisement -

काल मतदानाने अखेर शमली असून कोणाची राजकीय नाव तरणार, कोणाची बुडणार? यावर जोरदार चर्चा झडत असून चारही प्रभागांतील गठ्ठा मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असून याविषयी उमेदवारांसह मतदारांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाल्यापासूनच उमेदवार मिळवण्यापासून तर अर्ज माघारी घेण्यापर्यंत राजकीय कुरघोडी, डावपेच, नाराजी नाट्याने आखाडा चांगलाच रंगल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. तर दोन्ही गटांचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर ही लढत गडाखांच्याच दोन गटांत होत असल्याचे समोर आले.

कारण दोन्ही गटाच्या प्रचाराच्या फलकावर साधूसंत महापुरूषांच्या फोटोसह गडाख घुले बंधूंचे फोटो झळकत होते. तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा फोटो कुठल्याही फलकावर दिसला नसल्याने हा निवडणूक काळात चर्चेचा विषय बनला होता.

गत पंचवार्षिकला बाळासाहेब मुरकुटे यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत होती. मुरकुटे यांनी या ग्रामपंचायतीला दोन विधायक कामांसाठी निधीही दिलेला होता. असे असतानाही मग अचानक दुसरेच नेतृत्व कसे उभे राहिले? यावर सुप्त चर्चा शेवटपर्यंत सुरू होती. तर दोन-तीन पंचवार्षिक निवडणुका गडाख-लंघे गटात सरळ लढती पाहण्यास मिळाल्या आहेत.

मात्र मुरकुटे यांच्या आमदारकीनंतर सर्वच राजकीय गणितं बदलली होती. मुरकुटे गट तयार होऊन मागील पंचवार्षिक निवडणुकीत 11 पैकी 8 जागा मिळवत या गटाने सत्ता स्थापन केली होती. यावेळी मात्र सत्ताधारी ऐवजी गडाखांचा दुसरा गट सक्रिय झाल्याने गडाखांच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी का निर्माण झाली? हा संशोधनाचा विषय बनला असून केवळ राजकीय वैचारीक मतभेदातून नाराजी असल्याचे जाणकारांचे मत आहे.

काल झालेल्या निवडणुकीत 10 जागांसाठी अपक्ष उमेदवारांसह 21 जणाचे नशीब मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत काही उमेदवारांवर मतदारांची नाराजी असल्याचे दिसत होते. त्यामुळे क्रॉसवोटींग ही देखील उमेदवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. तर काही प्रभागांत जनशक्ती विरूध्द असेही भावनिक वातावरण तयार केल्याचे दिसत होते.

प्रभाग एक व दोन मध्ये निवडणुकीला भावकीचा रंग चढल्याचे दिसत होते. तर प्रभाग तीनमध्ये अपक्षांसह तीन उमेदवार सर्वसाधारण जागेवर नशीब आजमावत असून येथेही चांगलीच ‘काँटे की टक्कर’ पाहण्यास मिळाली आहे. गठ्ठा मतदानाचा कल येथे निर्णायक ठरणार आहे. प्रभाग चार हा सुरूवातीपासून चर्चेत आहे. हा प्रभाग राखीव असूनही उभ्या असलेल्या उमेदवारांकडे एकशिक्की मतदारांची फौज असल्याने सर्वांचे लक्ष या प्रभागाच्या निकालाकडे लागले आहे.

सध्या मतदारांकडून कोणी कोणाला शह देण्यासाठी प्रयत्न केले?, कोणी कोणाला प्रामाणिक साथ दिली? कोणत्या उमेदवाराचे भवितव्य तळ्यातमळ्यात आहे? कोणत्या गटाला किती जागेवर विजय मिळेल? अशा अनेक प्रश्नांवर खमंग चर्चा सुरू असून 18 जानेवारीच्या निकालानंतरच विषयाला पूर्णविराम मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या