Thursday, April 25, 2024
Homeनगरसाकूर चौफुलीवर पंचक्रोशीत नसलेल्या भलत्याच गावाचा बोर्ड

साकूर चौफुलीवर पंचक्रोशीत नसलेल्या भलत्याच गावाचा बोर्ड

साकुर |वार्ताहर| Sakur

पारनेर ते संगमनेर या राज्य महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील साकूर चौफुलीलगत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिशादर्शक, गावदर्शक फलक लावले असून, जे गाव साकूर पठार भागातच नाही त्या गावाचा चुकीचा फलक लावल्याने वाहनचालक संभ्रमात पडत आहेत. हा चुकीचा फलक तातडीने बदलून नव्याने जे गाव परिसरात आहे त्याच गावाच्या नावाचा फलक लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

- Advertisement -

साकूरपासून साधारण; 5 किमी अंतरावर हिवरगाव पठार या नावाचे गाव आहे. तसेच परिसरातील गावांचे दिशादर्शक, गावदर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने साकूर चौफुलीच्या चहूबाजूंनी बसविले आहेत. या ठिकाणाहून एक रस्ता संगमनेर कडे, दुसरा रस्ता मुख्य साकूरमध्ये, तिसरा रस्ता बिरेवाडी कडे तर चौथा रस्ता मांडवे बुद्रुक पारनेरकडे जातो. मात्र पारनेरसह मांडवे बुद्रुककडून साकूरकडे येताना चौफुलीच्या थोडंस पाठीमागे हिवरगाव पठार गावाचे नाव चुकून हिवरे पठार असा उल्लेख असलेला फलक बसविल्याने वाहनचालकांची दिशाभूल होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा दिशादर्शक फलक बसविण्यात आला पण या चुकीकडे कुणीही लक्ष दिले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या चुकीच्या फलकाकडे बघून एकच चर्चा रंगली आहे. मात्र, चुकीचा फलक दिसत असतानाही कुणाचेही याकडे लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच ज्या गावांची नावे दाखवायला पाहिजे ती न दाखवता भलतीच नावे टाकली आहेत. यामुळे या रस्त्याने प्रथमच जात असलेले वाहनधारक संभ्रमात पडत असून चुकीच्या दिशेने जात आहेत. यामुळे वेळ व पैसा दोन्हींचा अपव्यय होत आहे.

फलक बदलण्याची मागणी

साकूर ते मांडवे बुद्रुक या राज्य महामार्गावर साकूर चौफुलीलगत हिवरे पठार नावाचा बोर्ड लावला आहे. या नावाचे गावच पंचक्रोशीत नाही. नवीन वाहनचालकांना हिवरगाव पठार मार्गे घारगावला जायचे असेल तर हा दिशादर्शक फलक संभ्रम निर्माण करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चुकीचा फलक लावण्यात आला असून तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा फलक बदलावा, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या