साई सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आता इतर रुग्णांवर उपचार- कोते

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

कोविड संकटाच्या काळात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून अद्वितीय भूमिका बजावत साईबाबांचा आरोग्य सेवेचा वारसा समर्थपणे सुरू ठेवल्याबद्दल साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचा शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला असून शिर्डी ग्रामस्थांनी संस्थानचे साईबाबा सुपर स्पेशालिटी रूग्णालयात कोविड ऐवजी इतर रुग्णांवर उपचार करण्याची केलेली मागणीही मान्य करण्यात आली असल्याची माहीती शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी दिली.

कोविड संकटाच्या काळात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या. करोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असताना राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागताच साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी साईभक्त असलेल्या अंबानी आणि रमणी यांच्याशी संपर्क साधुन त्यांनी दिलेल्या दानातून भव्य अशी ऑक्सिजन प्लंट आणि अत्याधुनिक आरटीपीसीआर लॅबची निर्मिती केली. श्री. बगाटे यांच्या या कार्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले.

शिर्डीत काही तथाकथित लोकांकडून सध्या शिर्डीसह होत असलेली बदनामी तसेच साईबाबा संस्थान आणि संस्थानच्या रूग्णालयांना चुकीच्या पध्दतीने बदनाम करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, ज्येेष्ठ नगरसेवक अभय शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, अशोक कोते, शिवसेना शहरप्रमुख सचिन कोते, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, नगरसेवक सुजित गोंदकर, संदिप पारख आदी सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या सर्वपक्षीय बैठकीत शिर्डीतील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

साईबाबा संस्थानच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी करोनाच्या संकट काळात केलेल्या कामाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला. त्यानंतर या सर्वपक्षीय नेत्यांनी बगाटे यांच्या कार्यालयात जावून त्यांचा सत्कार करून त्यांच्या कामाला पाठिंबा दिला.

यावेळी राज्यातील गोरगरीब रूग्णांना वरदान ठरलेल्या साईबाबा सुपर हॉस्पिटलमधील करोनाबाधीत रूग्णांना कोविड सेंटरमध्ये हलवून या सुपर हॉस्पिटलमध्ये पुर्वीप्रमाणेच रूग्णांवर उपचार सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी श्री. बगाटे यांनी मान्य केली. शिर्डी ग्रामस्थांनी आजवर चांगल्या कामाला पाठिंबा देण्याचीच भुमिका बजावलेली असुन यापुढेही ती क़ायम ठेवली जाणार असल्याचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते व अभय शेळके यांनी प्रसार माध्यमांंशी बोलतांंना सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *