साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांच्यापुढे आव्हानांचा डोंगर

jalgaon-digital
3 Min Read

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे विधी न्याय खात्याने मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे दिली असून त्यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. ते जबाबदारी कसे सांभाळतील याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.

साईबाबा संस्थांनमध्ये मुख्य कार्यकारी पदावर आयएएस अधिकारी असावा, अशी मागणी याचिकाकर्ते तथा माजी विश्वस्त उत्तम रंभाजी शेळके यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. त्यावर निर्णय होऊन 2018 पासून पहिल्या आयएएस म्हणून रुबल अग्रवाल यांची नियुक्ती झाली होती, त्यांच्या काळात नाशिक येथील कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शिर्डीत अनेक विकास कामांना शासकीय मंजुरी मिळाली होती. त्यात काही कामे झाली तर काही कागदावरच राहिली. त्यातही अनेक आरोप झाले. त्यांची चौकशी न्यायपातळवीर अजूनही सुरूच आहे.

त्यांच्यानंतर दीपक मुगळीकर, अरुण डोंगरे, कान्हूराज बगाटे, भाग्यश्री बानायत हे आयएएस अधिकारी आले. मात्र त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आत त्यांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून विकासकामे, कामगारांचे प्रश्न, सुरू असलेले अद्ययावत शैक्षणिक संकुल, अद्ययावत दर्शनरांग या महत्वपूर्ण कामांना ब्रेक बसला, तर 598 कंत्राटी कामगारांचा प्रश्न, साईबाबा व साईनाथ हॉस्पिटलच्या औषधे डॉक्टरांच्या समस्या, पॅरा मेडिकल कामगारांच्या समस्या, रिक्त असलेले पदे, पदोन्नती, वेतनवाढ, अनुकंपा भरती, बदल्या हे मुख्य प्रश्न कायमच आणूनही प्रलंबित आहे.

यावर निर्णय घेण्यासाठी विश्वस्त मंडळाची खूप मोठी जबाबदारी होती. मात्र डॉ.सुरेश हावरे यांच्या अध्यक्षपदाखाली 2014 मध्ये स्थापन झालेले विश्वस्त मंडळही कायदेशीर कचाट्यात सापडले तर काही विश्वस्तांवर नियमबाह्य नियुक्ती झाल्याचे आरोप सिद्ध झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. डॉ.सुरेश हावरेंच्या कार्यकाल पूर्ण झाल्यावर शिर्डी विश्वस्त मंडळाचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडे सोपविण्यात आला होता. तर त्यानंतर दोनदा स्थापन झालेल्या विश्वस्त मंडळाला न्यायालयाने बरखास्त केल्याने साई संस्थानला मोठा आर्थिक फटका बसला.

अनेकवेळा साई संस्थानमध्ये भ्रष्टाचाराचे, वादविवादाचे प्रकरणे थेट उच्च न्यायालयात गेले. मुख्य कार्यकारी अधिकारी बानायत यांची शिर्डी ग्रामस्थांबरोबर अनेकवेळा शाब्दिक चकमक झाली. साई भक्तांना सुलभ दर्शन मिळावे याकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, अभय शळके, रमेश गोंदकर, विजय जगताप यांच्यासह शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन साई भक्तांना विविध सुविधा देण्याकरिता पाठवा केला. भाग्यश्री बानायत यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासकीय कामाचा प्रदीर्घ दांडगा अनुभव असल्याने त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेताच अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली. त्यात प्रामुख्याने एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कामगारांच्या, अधिकार्‍यांच्या बदल्या, कामकाजात शिस्त, भाविकांना आनंदाने व सुखरूप दर्शन घेण्याचे प्रयोजन, रखडलेली कामे, हॉस्पिटलमधील समस्या, औषधांची खरेदी, शिक्षण क्षेत्रातील समस्या, 598 कामगारांचे प्रश्न, कामगारांच्या वेतनाचा प्रश्न पारदर्शी टेंडर, शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्या व त्यांचा सन्मान यासह अनेम बाबींवर लक्ष केंद्रित करून सकारात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

कामाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ देऊन साई संस्थान कारभारात अनेक आमूलाग्र बदल करून महत्त्वाचे निर्णय घेत आहे. त्यामुळे साई संस्थान कर्मचारी वर्गात मोठे आनंदाचे व समाधानाचे वातावरण बघावयास मिळत आहे. शिस्तप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांच्या कारकिर्दीत शिर्डीचा विकास प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास साई भक्तांना व ग्रामस्थांना आहे. असे असले तरी त्यांच्यासमोर संस्थांच्या विकासासाठी अनेक आव्हाने आहे. हे आव्हाने ते कसे पेलतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागुन आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *